नंदुरबार l प्रतिनिधी-
गुजरात मध्य प्रदेश व महाराष्ट्रातून दुचाकी चोरून धडगावच्या जंगलात युवकाने लपवल्या होत्या. पोलिसांनी युवकाला अटक करत त्याच्या ताब्यातून दहा लाख 26 हजार रुपये किमतीच्या 19 मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत.
म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील राणीपूर येथील रहिवासी बळीराम कालुसिंग पराडके यांची हिरो कंपनीची मोटर सायकल चोरी झाल्याबद्दल फिर्याद वरुन म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेकडुन समांतर तपास सुरू असतांना स्था.गु.शा. पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना गुप्त बातमी मिळाली की, धडगाव शहरातील मेन बाजारात एक इसम विना क्रमांकाची महागडी मोटारसायकल विक्री करित आहे, अशी माहिती मिळाल्यावरुन स्था.गु.शा. पोलीस निरीक्षक श्री. खेडकर यांनी लागलीच एक पथक तयार करुन मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी रवाना केले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मिळालेले बातमीचे अनुषंगाने धडगाव शहरातील मेन बाजार परिसरात जाऊन खात्री केली असता, एक इसम विना क्रमांकाचे दुचाकी वाहनासह मिळून आला. सदर इसमाची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव भरत विरसिंग पावरा, वय 27 रा.हरणखुरी ता. धडगाव असे सांगितले. त्याचे ताब्यात मिळून आलेल्या मोटारसायकलचे कागदपत्रांबाबत विचारपूस करता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला त्यास विश्वासात घेऊन अधिक विचारपूस करता त्याने सदरची मोटारसायकल मध्यप्रदेश येथून चोरी करुन आणल्याचे सांगितले. तसेच अधिकची विचारपूस करता त्याने मागील काही दिवसांमध्ये गुजरात व मध्यप्रदेश राज्यातून अजुन काही महागड्या मोटारसायकली चोरी करुन आणलेल्या असून त्या त्याचे राहत्या गावाचे बाहेर जंगलात लपवून ठेवले असल्याची सविस्तर माहिती दिली. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सदर इसम भरत पावरा यास ताब्यात घेतले व त्याने दिलेल्या माहितीचे आधारे नमुद ठिकाणी जाऊन तपासणी केली असता तेथे देखील काही मोटारसायकली मिळून आल्या आहेत. भरत पावरा यांच्याकडून स्थानिक गुन्हे शाखेला 10 लाख 26 हजाराच्या एकूण 19 मोटारसायकली जप्त करण्यात यश मिळाले आहे.
सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, पोउपनि-श्री.मुकेश पवार, पोहेकॉ सजन वाघ, पोहेकॉ मुकेश तावडे, पोहेकॉ मनोज नाईक, पोहेकॉ बापू बागुल, पोहेकॉ सुनिल पाडवी, पोहेकॉ राकेश मोरे, पोना अविनाश चव्हाण, पोना मोहन ढमढेरे,
पोशि अभिमन्यु गावीत, पोशि दिपक न्हावी, पोशि शोएब शेख, पोशि, अभय राजपुत यांनी केली आहे.