नंदुरबार l प्रतिनिधी-
बदलापूर येथील व राज्यातील इतर जिल्ह्यात शैक्षणिक संस्थेत घडलेल्या घटने प्रकरणी दोषी असणाऱ्या नराधमांसह संस्थाचालक व दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणी करिता शिवसेना उबाठा पक्षामार्फत काळ्या फिती लावून भर पावसात जिल्हाप्रमुख अरुण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
बदलापूर येथील शैक्षणिक संस्थेतील सफाई कर्मचाऱ्याने दोन अल्पवयीन विद्यार्थिनींशी अमानवीय कृत्य केल्याची घटना घडली आहे तसेच गेल्या काही दिवसात किमान 11 पेक्षा अधिक घटना विद्यार्थिनींच्या छेडछाडप्रकरणी व शिक्षकांनी अथवा कॅब चालकाने अश्लील हवभाव केल्याप्रकरणीच्या घटना उघडकीस आल्या आहेत.
विशेष म्हणजे बदलापूर येथील घटना उघडकीस आल्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांची तक्रार तेथील पोलीस प्रशासनाने उशिरा दाखल करून घेतली तसेच संस्थाचालकांनी याबाबत विशेष गांभीर्य दाखविले नाही यामुळे या संपूर्ण घटना क्रमात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे.
एकीकडे शासन महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर असल्याचे सांगतोय मात्र दुसरीकडे बदलापूर सह राज्यातील विविध ठिकाणी गेल्या चार दिवसात अशा 11 घटना उघडकिस आल्या असून यातून राज्यातील तरुणी व महिला सुरक्षित नाहीत असे स्पष्ट होते महिलाच्या सुरक्षिततेबाबत गृह मंत्रालय व राज्य शासन गंभीर नाही परिणामी अशा घटना घडत आहेत. याप्रकरणी नेमण्यात आलेल्या विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती तात्काळ रद्द करत त्यांच्या ऐवजी राज्यातील निष्णांत तज्ञ वकिलाची नियुक्ती करून पीडित युवती व कुटुंबीयांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. पीडित कुटुंबास न्याय मिळावा अन्यथा तीव्र स्वरूपाची आंदोलन करण्यात येईल.
नंदुरबार जिल्हा शिवसेना उबाठा पक्षामार्फत बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ अंधारे चौकात आज काळ्या भीती लावून आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख अरुण चौधरी, महिला आघाडी प्रमुख रीना पाडवी, महानगरप्रमुख पंडित माळी, उपजिल्हाप्रमुख अर्जुन मराठे, तालुकाप्रमुख रमेश पाटील, सुनील सोनार, विनोद चौधरी, राजधर माळी, सागर पाटील,
भक्तवत्सल सोनार, दादा कोळी, राहुल कोळी, दिनेश भोपे, इम्तियाज कुरेशी, राज पाटील, छोटू चौधरी, चारुलता बागुल, प्रतिभा धनगर, रेखा मराठे, वासुदेव गांगुर्डे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते