नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यात कुठेही बाल विवाह होत असल्यास जिल्ह्यात पोलीस प्रशासन, महिला बाल विकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बाल कल्याण समिती , महिला व बाल विकास क्षेत्रात काम करणाऱ्या स्वंयसेवी संस्था, चाईल्ड हेल्प लाईन 1098 व गाव बाल संरक्षण समिती यांच्याकडे त्वरीत संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी साईनाथ वंगारी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
जिल्ह्यातील बालविवाह रोखण्याची मोहिम राबविण्यात येत असून गावात, पाड्यात, शहरात, एखाद्या मुला-मुलींचा बालविवाह होत असल्याचे नागरिकांमार्फत चाईल्ड हेल्पलाईन (1098) जिल्हा बाल संरक्षण कक्ष किंवा पोलिस विभाग यांच्याकडे दुरध्वनी, लेखी किंवा कोणत्याही व्यक्तीच्या माध्यमातुन तक्रार प्राप्त झाल्यास तात्काळ जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, यांना कळविण्यात येते. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या निर्देशानुसार जिल्हा बाल संरक्षण कक्षातील अधिकारी व चाईल्ड हेल्पलाईन 1098 यांच्यामार्फत प्राप्त तक्रारीबाबत मुला-मुलींचे वय गोपनिय रित्या पडताळणी करून तशी खात्री झाल्यानंतर पोलीस विभागाच्या संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधुन होणाऱ्या बालविवाह बाबतची माहिती तक्रारीसह पोलीस विभागाच्या निर्दशनास आणून देण्यात येते.
पोलीस विभागातील विशेष बाल पोलीस पथक, महिला बाल विकास अधिकारी कार्यालयातील जिल्हा बाल संरक्षण कक्षातील अधिकारी, कर्मचारी, चाईल्ड लाईन संस्थेचे कर्मचारी हे विवाह होणाऱ्या गावी प्रत्यक्ष जाऊन त्या गावातील ग्रामपातळीवर गठीत ग्राम बाल संरक्षण समितीच्या निर्दशनास आणुन व त्यांच्याशी चर्चा करून बालविवाह होणाऱ्या बालकांच्या पालकांची प्रत्यक्ष भेट घेवून त्यांना बालविवाहाचे सामाजिक दुष्परिणाम, बालविवाह प्रतिबंध कायदा, 2006 मधील कायदेशीर तरतुदी अल्पवयात बालिका प्रसुती झाल्यास अल्पवयीन माता व जन्माला आलेल्या अपत्यावर होणारे दुष्परिणाम याबाबत संबंधित बालकांच्या पालकांचे समुपदेशन करून होणारा बालविवाह समुपदेशनाद्वारे थांबविला येतो.
बालविवाह होणारे बालक, बालिका व पालक यांना बाल कल्याण समितीसमोर तात्काळ उपस्थित राहण्याच्या सुचना दिल्या जातात. या सुचनेच्या अनुषंगाने बालविवाह होणारे बालक व पालक यांना 24 तासांच्या आत बाल कल्याण समितीसमोर सादर केले जाते. त्यानंतर बाल कल्याण समिती अध्यक्ष, सदस्य यांच्यामार्फत बालविवाह संदर्भातील तक्रार बालविवाह होणाऱ्या बालकाचे वय, वस्तुस्थिती यांची पडताळणी करण्यात येवून संबंधीत पालकांकडुन या बालकाचे वय 18 (मुलगी ) व 21 (मुलगा) वर्षे पुर्ण होण्यापुर्वी विवाह करणार नाही असे हमी पत्र घेण्यात येते. बालविवाह प्रतिबंध कायदा-2006 मधील तरतुदी नुसार 18 वर्ष वयापेक्षा जास्त वर्षाच्या पुरूषाने बाल वधुशी विवाह केल्यास त्या पुरूषाला 2 वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि 1 लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. बालविवाह झाल्यानंतर वधु व वर यांचे आई वडील किंवा पालक अन्य नातेवाईक मित्रपरिवार असे सर्व ज्यांनी हा विवाह घडविण्यास प्रत्यक्षात मदत केली. किंवा जे अशा विवाहास सामिल होते.
जसे की, मंडप डेकोरेटर्स मालक, बॅड किंवा DJ चे मालक, भटजी, विवाह समारंभ पार पडत असलेल्या जागेचे मालक, स्वयंपाकी, फोटोग्राफर अशा सर्वाना 2 वर्षापर्यत सक्त मजुरीची कैद आणि 1 लाख रुपयांपर्यत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. सर्वोच्च्य न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार कायद्याने अल्पवयीन ठरविलेल्या व्यक्तीचे लग्न झाल्यास पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊ शकतो. तसेच बालविवाह होणारे बालक हे विवाहचे कायदेशीर वय पुर्ण करत नाही तोपर्यंत संबधित बालक व पालक यांना प्रत्येक महिन्याला बाल कल्याण समिती समोर प्रत्यक्ष उपस्थित राहणे बंधनकारक असते. कायदेशीर विवाहाचे वय पुर्ण केल्यानंतर बाल कल्याण समितीमार्फत सदर बालक व बालिकेला प्रमाणपत्र देत विवाहासाठी परवानगी देण्यात येते.
बालविवाह थांबविण्याची कायदेशीर प्रक्रिया वरील यंत्रणामार्फत पार पाडली जात असून जिल्ह्यात बालविवाह थांबविण्यात येत आहेत असेही श्री. वंगारी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.