नंदुरबार l प्रतिनिधी
मोदी सरकार आदिवासींचे आरक्षण हटवणार, हे काँग्रेस नेत्यांचे सांगणे जर खरे ठरले तर मी राजकारण सोडून देईल. परंतु मोदी सरकारने तसे नाही केले तर के. सी.पाडवी हे राजकारण सोडतील का? या शब्दात महायुतीचे उमेदवार डॉक्टर हिनाताई गावित यांनी आज काँग्रेस नेते के सी पाडवी यांना जाहीर आव्हान दिले. धडगाव येथे पार पडलेल्या भव्य प्रचार मिरवणुकीनंतर जाहीर सभेत बोलताना डॉक्टर हिनाताई गावित यांनी हे आव्हान दिले.
मोलगी, साक्री, शहादा पाठोपाठ आज 7 मे 2024 रोजी धडगाव येथेही भल्या मोठ्या जनसमुहाच्या उपस्थितीत महायुतीच्या तथा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार डॉक्टर हिना विजयकुमार गावित यांची भव्य प्रचार मिरवणूक पार पडली. धडगाव येथील चहू बाजूचे रस्ते अक्षरशः माणसांच्या गर्दीने फुलून गेले होते. महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित, एकनाथराव शिंदे गटाच्या शिवसेनेचे विधान परिषद सदस्य आमशा पाडवी यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या भव्य प्रचार फेरीत भाजपाचे प्रदेश सदस्य नागेश दादा पाडवी, शिवसेनेच्या महिला प्रमुख प्रणिती पोंक्षे, तालुका अध्यक्ष हिरालाल पाडवी, माजी तालुका अध्यक्ष शिवाजी पराडके, लतेश मोरे, सुभाष पावरा, दित्या पाडवी यांच्यासह गावागावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती सदस्य व अन्य स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अक्कलकुवा विधानसभा क्षेत्रातील दुर्गम गाव पाड्यातून शेकडोच्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित राहिले आणि सहभागी झाले. पारंपारिक आदिवासी नृत्य करीत मिरवणुकीच्या अग्रभागी चालणाऱ्या पथकांनी लक्ष वेधले. ढोल वाजवणाऱ्या पथकांनी सुद्धा या मिरवणुकीत विशेष छाप पडली. संपूर्ण मोलगी परिसर मिरवणुकीसाठी आलेल्या लोकांनी फुलून गेलेला दिसला. मिरवणुकीच्या समाप्तीनंतर झालेल्या जाहीर सभेप्रसंगी रणरणत्या उन्हातही शेकडोच्या संख्येने आदिवासी ग्रामस्थ उपस्थित राहिले.
आदल्या रात्री म्हणजे दिनांक 6 मे 2024 च्या रात्री शहादा शहरात देखील असेच भव्य प्रचार मिरवणूक पार पडली त्या प्रचार मिरवणुकीत मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, भाजपाचे आमदार राजेश पाडवी, सातपुडा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पटेल, सभापती हेमलता शितोळे यांच्यासह स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, मिरवणूक संपल्यानंतर झालेल्या जाहीर सभेत आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आरक्षण आणि संविधान या संदर्भाने काँग्रेस कडून केली जाणारी दिशाभूल सविस्तरपणे मांडली. विधान परिषद सदस्य आमशा पाडवी यांनीही काँग्रेसवर टीकेचा भडीमार करताना सांगितले की अक्कलकुवा धडगाव तालुक्यातील आदिवासी मतदारांचा काँग्रेसने केवळ वापर केला वर्षानुवर्ष आमदार राहिलेले येथील नेते कधीही विकास करू शकले नाही अशा लोकांच्या भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन पाडवी यांनी केले.
तर महायुतीचे उमेदवार डॉक्टर हिनाताई गावित यांनी आपल्या घणाघाती भाषणात सांगितले की, आम्ही आदिवासी जनतेला लाभ देतो याविषयी काँग्रेस नेत्यांचे पोट दुखते परंतु सर्व मतदारांनी 13 मे रोजी क्रमांक तीन चे बटन जोरदार दाबले तर यांची पोटदुखी नक्कीच थांबून जाईल. अक्कलकुवा धडगाव तालुक्यातील दुर्गम भागातल्या लोकांना 2014 नंतर माझ्या खासदारकीच्या कार्यकाळात वीज रस्ते घरे मिळाली हजारो बेघरांना घरकुल मिळाले. मग प्रश्न पडतो की मागील 35 वर्ष सत्ता भोगणाऱ्या येथील नेत्यांनी नेमके केले काय? असा प्रश्न करतानाच महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिनाताई विजयकुमार गावित यांनी सांगितले की, जनता जनार्दनाचे मला आशीर्वाद आहेतच परंतु, अस्तंबा ऋषींचे शिखर असलेल्या रस्त्यावर सुद्धा विज पोहोचवण्याचे काम सर्वप्रथम माझ्या प्रयत्नातून झाले असल्याने आपल्या राजकीय लढाईला अस्तंबा ऋषींचेसुद्धा आशीर्वाद लाभतील; असा विश्वास व्यक्त केला. खासदारकीच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात आपल्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या सर्व म्हणजे सहा विधानसभा मतदारसंघातील प्रश्न मी संसदेत मांडत आली. त्यात सर्वाधिक समस्या आणि प्रश्न एकट्या अक्कलकुवा धडगाव तालुक्यातील होत्या. विकास कामे करताना कायम या भागाला डोळ्यासमोर ठेवले.
स्वातंत्र्यानंतर अजून पर्यंत विद्युतीकरणापासून वंचित राहिलेल्या दुर्गम भागाला सोलार लाईट दिले डिप्या बसवून विजेचा प्रश्न सोडवला. पाड्यापाड्यांना रस्ते दिले. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात खासदारकीच्या माध्यमातून पावणेदोन लाखहून अधिक बेघरांना घरकुल मिळवून दिले. धडगाव तालुक्यातील हजारो बेघरांचा त्यात समावेश आहे, असे डॉक्टर हिनाताई गावित म्हणाल्या.