नंदुरबार l प्रतिनिधी
खा.राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा नंदूरबार येथे आली असता माजीमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲड. पद्माकर वळवी यांनी काल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती.आज बुधवारी मुंबईत त्यांनी अनेक कार्यकर्त्यांसोबत भाजपात प्रवेश केला.
नंदुरबार येथे काँग्रेसतर्फे खा.राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा नंदूरबार येथे आली होती.यावेळी देशातील काँग्रेसचे मोठे नेते जिल्हयात असताना माजीमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲड. पद्माकर वळवी यांनी काल मुंबई येथे भाजपा कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. माजीमंत्री पद्माकर वळवी हे गेल्या अनेक महिन्यांपासून काँग्रेसच्या कार्यक्रमांपासून लांब दिसत होते.
राहूल गांधी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमिवरही प्रदेशाचे नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्या कार्यक्रमातही ते उपस्थित नव्हते. ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी राजकीय चर्चा गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यात होती. अखेर या चर्चाना पूर्ण विराम मिळाला असून मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात काँग्रेसचे माजी मंत्री अॅड. पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश सोहळा आज पार पडला. यावेळी भाजपा प्रदेश अध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा – शहादा विधानसभा मतदार संघाचे माजी मंत्री काँग्रस पक्षाचे नेते अॅड. पद्माकर वळवी यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
याप्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री आ. गिरीश महाजन, माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण, आदिवासी विकास मंत्री ना. डॉ. विजयकुमार गावित, भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी आदी उपस्थित होते.