नंदुरबार l प्रतिनिधी
अफ्रिकन स्वाईन फिवर या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भावाचे शहादा तालुक्यातील म्हसावद या ठिकाणचे तपासणी निष्कर्ष होकारार्थी आला आहे. या रोगाचा प्रसार अन्य ठिकाणी होवू नये म्हणून प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 नुसार संसर्ग क्षेत्रापासून एक किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र व 10 किलोमीटर परिघातील क्षेत्र संनियंत्रण क्षेत्र म्हणून म्हणून घोषित केले असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा मनीषा खत्री यांनी दिले आहेत.
अफ्रिकन स्वाईन फिवर हा विषाणूजन्य रोग पाळीव व जंगली वराहांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरणारा सांसर्गिक रोग असून त्याचा संसर्ग सर्व वयोगटातील पाळीव व जंगली वराहांमध्ये होत असतो. या रोगाची लागण किंवा प्रसार बाधित वराहांच्या शरीरातून निघणाऱ्या द्रावण, दुषित खाद्य व चारा तसेच किटकांच्या माध्यमांतून इतर वराहांना होतो. अफ्रिकन स्वाईन फिवर हा विषाणूजन्य रोग वराहांपासून माणसांमध्ये होत नाही, त्यामुळे सदर रोगापासून मानवी आरोग्यासाठी धोका नाही.
नंदुरबार जिल्ह्यात या विषाणूजन्य रोगाचा पाळीव व जंगली वराहांमध्ये संभाव्य प्रादुर्भावाचा प्रतिबंधात्मक उपयोजनेसाठी जिल्ह्यातील वराह पालन व्यवसायिक, व्यापारी, वराह मांस विक्री केंद्र (कसाई) व नागरिकांनी आप-
आपल्यास्तरावर काटेकोरपणे जैवसुरक्षा प्रणालीचा अवलंबन करावा.
*जैवसुरक्षा प्रणालीचा अवलंबन करतांना या बाबींचा समावेश करावा..*
• बाधित क्षेत्राचा 1 किमी परिसरातील सर्व वराहांचे कलींग करुन त्यांची विल्हेवाट शास्त्रीय पध्दतीने लावुन त्या परिसराचे निजंतुकीकरण करावे.
• आफ्रिकन स्वाईन फिवर (ASF) या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधित परिसरात सक्रिय संनिरक्षण व्यापक प्रमाणावर करावे. व सुयोग्य जैवसुरक्षा उपाययोजना कराव्यात. पाळीव तसेच जंगली वराहातील अनियमित मर्तुकीवर बारकाईने लक्ष ठेवावे.
• वराहाच्या मासांची विक्री करणाऱ्या आस्थापनाची नोंदणी करण्याची प्रक्रिया पूर्ण करुन त्या आस्थापनांना स्थानिक पशुवैद्यकांनी नियमितपणे भेटी देवून नियंत्रण ठेवावे. तसेच मोकाट पध्दतीने होणारे वराह पालन टाळावे.
• घरगुती तसेच हॉटेलमध्ये वाया गेलेले, शिल्लक राहीलेले अन्न वराहांना देणे ही याच विषाणुच्या प्रसारास मुख्यत्वे करुन कारणीभूत असल्याने अशा प्रकारचे खाद्य देणे टाळणे गरजेचे असून निरोगी वराहाचा घरगुती व कत्तलखान्यातील कच्चे मांस उपपदार्थ तसेच कचरा यांच्याशी संपर्क येवू देवू नये.
• वराहपालन केंद्रातील तसेच वराह मांस विक्री केंद्रातील कचरा एकत्रित साठवु नये. सर्व कचरा नष्ट करावा अथवा त्याची सार्वजनिक कचरा व्यवस्थापनाकडून शास्त्रोक्त दृष्ट्या योग्य रितीने विल्हेवाट लावावी.
• वराहपालन करणारे पशुपालक वा व्यवसायासंबंधित व्यक्ती (उदा. व्यापारी, कसाई, वितरक ई.) यांच्यामध्ये या रोगाविषयी जागृकता निर्माण करुन रोगाच्या प्रादुर्भावाविषयी सुचना देणे व सुप्त संनिरीक्षण करण्यासाठी अवगत करावे.
• पशुसंवर्धन विभागातील क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी पोलीस व चेकनाके यांच्याशी समन्वय ठेवुन शेजारील राज्यातील वराहाची अनधिकृत प्रवेश होणार नाही, यांची दक्षता घ्यावी.