नंदुरबार l प्रतिनिधी
समस्त राजपूत समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी पाचोरा तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाविषयी प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे राज्य उपाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांनी मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
रणजीतसिंग राजपूत यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राजपूत समाजास जात प्रमाणपत्राचे अडचणी सोडवाव्यात, महाराणा प्रतापसिंह आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी. इत्यादी प्रलंबित मागण्यासाठी राजपूत समाजातर्फे युवा नेते गिरीश परदेशी पाचोरा तहसील कार्यालया समोर आमरण उपोषणास बसले आहेत. यापूर्वी
पाचोर्याचे आमदार किशोरआप्पा पाटील यांनी उपोषण स्थळी भेट देऊन चर्चेद्वारे मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केल्याने जळगाव येथील आमरण उपोषण स्थगित करण्यात आले होते.
राजपूत जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देणेबाबत प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असून त्यावर ठोस निर्णय व्हावा व महाराणा प्रतापसिंह आर्थिक विकास महामंडळ 15 जानेवारी पर्यंत होईल असे नामदार अतुल सावे यांनी विधिमंडळात लक्षवेधी सूचनेवर सभागृहात जाहीर करून देखील मुहूर्त निघाला नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर राजपूत समाजात असंतोषनिर्माण झाला असून लवकरच आंदोलन तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यास्तव राजपूत समाजाच्या प्रलंबित मागण्यांची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय व्हावा अशी मागणी रणजीतसिंग राजपूत यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे निवेदनाद्वारे यांच्याकडे केली आहे.
दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्री अतुल सावे यांना देखील प्रत्यक्ष भेटून रणजीतसिंग राजपूत यांनी राजपूत समाजाच्या मागण्यां विषयी चर्चा केली.