शहादा l प्रतिनिधी-
नंदुरबार तालुक्यातील तापी नदीच्या पट्यातील शेतकरी बांधवांसाठी वरदान ठरणाऱ्या सिध्देश्वर व दीपकनाथ उपसा सिंचन योजनेच्या कामास जलसंपदा विभागाच्या वतीने प्रारंभ करण्यात आला आहे.
समशेरपूर येथील सिद्धेश्वर उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्तीसाठी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता तुषार चिनावलकर व सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष दीपकभाई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी परिसरातील उपसा सिंचन योजनेचे लाभार्थींसह शेतकरी हजर होते.यावेळी बोलतांना श्री.चिनावलकर म्हणाले,उपसा सिंचन योजनेचे सिव्हिल काम लवकरच पूर्ण करण्यात येईल.
अन्य संबंधित कामांनाही प्राधान्य देऊन लवकरात लवकर काम कसे होईल याकडे संपूर्ण लक्ष दिले जाईल.योजनेच्या कामांची सविस्तर माहिती बापूसाहेब दीपकभाई पाटील यांनी समजून घेतली.परिसरातील शेती सिंचनाखाली यावी यासाठी अडचणी दूर सारून सर्वच उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यात याव्यात यासाठी आपण प्रयत्नशील असून संबंधित ठेकेदार यांनी सदर काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी सूचना त्यांनी यावेळेस केली.
समशेरपुर एमडीसी पासून कामाला सुरुवात करण्यात आली असून दीपकनाथ उपसा सिंचन योजनेच्या सिव्हिल कामासही सुरूवात करण्यात आली आहे.यावेळी लहान शहादे,समशेरपुर परिसरातील शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.