नंदुरबार l प्रतिनिधी
रघुवंशी समाजाच्या वतीने अयोध्येत 2121 कुंडी श्रीराम महायज्ञ होत आहे. १० ते १८ फेब्रुवारी पर्यंत सर्वात मोठा यज्ञ होत असून, देशभरातील समाज बांधव या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती माजी आमदार तथा रघुवंशी समाजाचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली.
अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर त्या ठिकाणी समाजाच्या वतीने देशातील सर्वात मोठा श्रीराम महायज्ञाला १० फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. माजी आ.चंद्रकांत रघुवंशी व नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी सपत्नीक यज्ञ पूजेत सहभागी होणार आहेत. पहिल्याच दिवशी 5100 राम भक्त 1100 कलशांसह कलश यात्रा काढणार आहेत.
या महायज्ञात रघुवंशी समाजाचे सुमारे 15 हजार भाविक सहभागी होणार असून, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, अयोध्येचे आमदार वेदप्रकाश गुप्ता या महायज्ञात सहभागी होणार आहेत. या सोहळ्याला भव्य स्वरूप देण्यासाठी सुमारे महिनाभर शरयू नदीचा काठावर ६० एकर जागेवर हवनकुंड आणि तंबूनगरी उभारली जात आहे.
महायज्ञाच्या भव्य विधी संत आत्मानंद दास महात्यागी नेपाळी बाबा यांच्या संयोगाने होत आहे. त्यासाठी 1008 नर्मदेश्वर शिवलिंगाची स्थापना करण्यात येणार आहे. 9 दिवस चालणाऱ्या या ऐतिहासिक महायज्ञात चित्रकूटचे जगतगुरु रामस्वरूप आचार्यजी महाराज यांच्याकडून संगीतमय रामकथाही सांगितली जाणार आहे.