नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार जिल्ह्यात भाजपातर्फे ४ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत गाव चलो संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. भाजपाचे एकूण १ हजार ३८४ कार्यकर्ते जिल्ह्यातील गावागावात जाऊन भाजपाचा १७ कलमी कार्यक्रमानुसार काम करणार असून पक्ष संघटनासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी दिली. नंदुरबार येथे भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी विजय चौधरी म्हणाले की, भाजपाच्या विविध अभियानांचा एक भाग म्हणून आता गाव चलो संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्ह्यातील १ हजार ३८४ कार्यकर्त्यांमध्ये मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्यासह भाजपाच्या खा.डॉ.हीना गावित, आ. राजेश पाडवी तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते असे एकूण १ हजार ३८४ जण एका गावात एक कार्यकर्ता प्रवासी कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. २४ तास एका गावात राहून आढावा घेतला जाणार आ हे. भाजपाचा १७ कलमी कार्यक्रमांतर्गत युवा संपर्क, लाभार्थी संपर्क, योजनांचा आढावा, पदाधिकारी, नव मतदार नोंदणी, नमो ॲप डाऊनलोड करणे आदी कामे करण्यात येणार आहे.
५१ टक्क्यापेक्षा कमी मतदान असलेल्या ठिकाणी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी कार्यकर्ते काम करणार आहेत. तीन टप्प्यांमध्ये सदरचे अभियान पूर्ण करण्यात येणार आहे. पक्ष संघटनासोबतच शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहचला किंवा नाही याचा देखील आढावा यादरम्यान घेण्यात येणार असल्याचे विजय चौधरी यांनी सांगितले.यावेळी जिल्हाध्यक्ष निलेश माळी उपस्थित होते.