नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहराबाहेरील जगतापवाडी परिसरात भारतीय खाद्य महामंडळाच्या गोदामात माल चढविण्याचे व उतरविण्याचे काम करणाऱ्या सुमारे ३५ मजूरांचे अपहरण केल्याप्रकरणी ८ ते १० संशयितांविरोधात नंदूरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहराबाहेरील जगतापवाडी परिसरात रात्री २ ते २.३० वाजेच्या सुमारास गावातील काही ८ ते १० जणांनी धमक्या देत सुमारे ३५ मजूरांना एका आयशरमध्ये बसवून अपहरण केले. सदरची माहिती मिळताच पोलिसांनी पाठलाग करत शिंदखेड्याहून सदर मजूरांची सुटका केली.
याप्रकरणी बिहार राज्यातील खगडीया जिल्ह्यातील भरतखंड येथील रुपेश यावद लड्डू यादव (व्यवसाय मजूरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर फिर्यादीवरुन संशयितांविरोधात भादंवि कलम ३६४, ३२३, ५०४, आर्म ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणी वाहन चालकास अटक करण्यात आली असून इतर संशयितांचा शोध सुरु आहे. पोलिस तपास पोलिस निरीक्षक राहूलकुमार पवार करीत आहेत.