नंदुरबार l प्रतिनिधी
नवी दिल्लीत देशाच्या संसदेत राष्ट्रपती अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव मांडणारे पहिले भाषण करण्याची संधी मोदी सरकारने नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर हिना गावित यांना दिली आणि एक मोठा चमत्कार घडावा त्या प्रमाणे खा.डॉ. हिना गावित यांनी दणदणीत भाषण करीत संसदेला चकित करून सोडले.
महिलांचा सन्मान वाढवण्यासाठी मोदी सरकारने काय केले, हे मुद्देसूद सांगितले. मोदी सरकार कशा रीतीने आदिवासी समूहांना प्रमुख प्रवाहात आणून आत्मनिर्भार बनवत आहे, याची प्रभावी मांडणी केली.
जनतेला लाभ देण्यात धन्यता मानणारे विरुद्ध लोकांना झुलवण्यात धन्यता मानणारे अशी सध्याची राजकीय लढाई असल्याचा उलगडा त्यांनी केला. भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस प्रणित इंडिया आघाडी यांच्यातील लढाई म्हणजे डिले वर्सेस डिलिव्हरी यांच्यातील लढाई आहे, असे सोप्या शब्दात त्यांनी ते मांडलं.
तब्बल 40 मिनिटे दमदार आणि शानदार बॅटिंग करणारे भाषण करीत नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर हिना गावित यांनी समस्त खानदेश वासीयांचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रवासीयांचे आणि देशाचेही मन जिंकून घेतले.
याबद्दल दस्तुरखुद्द देशाचे संरक्षण मंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह, स्मृती इराणी व अन्य सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सभागृहातच खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांचे विशेष अभिनंदन केले. खासदार डॉक्टर हिना गावित या महाराष्ट्रातील पहिल्या एकमेव महिला खासदार आहे ज्यांना राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव मांडणाऱ्या भाषणाची संधी देण्यात आली.
खासदार डॉक्टर हिना गावित यांना भारतीय जनता पार्टीने देश स्तरावरची तिसऱ्यांदा ही अशी संधी देणं, ही लक्ष वेधून घेणारी सर्वात महत्वाची बाब ठरली.