नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने ‘आनंदाचा शिधा’ या नावाने महाराष्ट्रतील जनतेला अल्पदरात जीवनावश्यक वस्तु उपलब्ध करून देत आहे. अयोध्येतील प्रभू श्रीरामचन्द्र प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आणि छ. शिवाजी महाराज जयंती निमित्ताने ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्याचे महाराष्ट्र शासनाने जाहीर केले आहे.
त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात आनंदाचा शिधा वाटप करण्यासाठी शासनाकडून प्लास्टिकसारख्या पिशव्या पाठविल्या आहेत. त्या पिशव्यांवर हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामचन्द्र आणि छ. शिवाजी महाराज यांचेही छायाचित्रे छापली आहेत. त्या पिशव्या टिकाऊ नसून टाकाऊ आहेत त्यामुळे प्रभू श्रीराम आणि छ. शिवाजी महाराज यांच्या छायाचित्रांचा अवमान होऊ शकतो म्हणून प्रभू श्रीरामचंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे छायाचित्र असलेल्या पिशव्या रहित कराव्या अश्या आशयाचे मागणीचे निवेदन हिंदु सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,अन्न नागरी पुरवठा व संरक्षण विभागाचे सचिव यांना ईमेलद्वारे पाठवून केली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, प्रभू श्रीरामचंद्र छत्रपती शिवाजी महाराज यांचे छायाचित्र लावण्यामागे जरी शासनाच्या हेतू चांगला असला तरी सुद्धा पिशव्यांची गुणवत्ता बघता त्या पिशव्या टिकाऊ नाहीत तर टाकाऊ आहेत, थोड्या दिवसांनी त्या फाटतील आणि रस्त्यावर किंवा नको त्या ठिकाणी पडलेले अवस्थेत मिळू शकतात हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या छायाचित्राचे अवमान होऊ शकतो. तरी महाराष्ट्र शासनाने आणि प्रशासनाने प्रभू श्रीरामचंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे छायाचित्र असलेल्या पिशव्या रहित करून नवीन पिशव्या ज्यावर देवी देवता आणि राष्ट्रपुरुष यांचे छायाचित्र नसलेल्या पिशव्या आनंदाच्या शिधासाठी वापर करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.