तळोदा l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील ३५९ गावात ११ हजार २३७ गुरांमध्ये लंपीस्किन आजार आढळून आला असून त्यापैकी ९ हजार ५५१ गुरे बरी झाली आहेत. जिल्ह्यात एकूण १ लाख ३९ हजार १४१ एवढ्या गुरांचे लसीकरण झाले आहे. पशुपालकांना जिल्हा परिषदेमार्फत सामान्य शेतकर्यांसाठी उपलब्ध केलेल्या लसीकरणाचा लाभ घेऊन, आपल्या पशूंचे रक्षण करावे असे आवाहन जि.प.अध्यक्षा ऍड.सिमा वळवी यांनी दलेरपुर येथे लंपीस्किन आजारावरील लसीकरण तसेच गोचीड गोमाशा प्रतिबंधक उपचार शिबिरा प्रसंगी केले.
नंदुरबार जिल्ह्यात सध्या जनावरांमध्ये लंपीस्किन नावाचा आजार मोठया प्रमाणावर आढळून येत आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जि.प.मार्फ़त प्रभावी उपाययोजना करण्यात येत असून जनावरांमधील लंपी स्किन या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी जि.प.च्या पशुसंवर्धन विभागामार्फत मोठ्या प्रमाणावर लंपीस्किन निर्मूलन मोहीम व गोचीड, गोमाशा प्रतिबंधक उपचार पशुवैद्यकीय दवाखान्यात सुरू आहेत. सप्टेंबरच्या सुरुवातीस नवापूर तालुक्यात पहिल्यांदाच जनावरांमध्ये लंपीस्कीन नावाच्या आजाराचे निदान झाले.त्यामुळे गावागावात पशुपालकांना चिंता वाटू लागली. या अनुषंगाने तात्काळ ज्या ग्रामपंचायतींना शक्य असेल त्यांनी रुपये १० हजार पर्यंत ग्रामनिधीतून या आजाराच्या नियंत्रणासाठी खर्च करण्याची परवानगी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली. तसेच पशुवैद्यकीय सेवा शुल्कातून ही निधी उपलब्ध करुन देण्यात आला. फक्त नवापूर तालुक्यात लंपीस्किन आजारावरील गोटपॉक्स लसीकरण करण्यात आले .परंतु पुढे हा आजार संसर्गजन्य असल्याने इतर तालुक्यात पसरू शकतो याची दखल घेऊन जि.प.च्या सर्वसाधारण सभेत चर्चा करण्यात आली.त्यावेळी पशुपालकांच्या दुग्ध व्यवसायास तसेच शेतीच्या बैलांना संरक्षण प्राप्त होण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात लसीकरण मोहीम राबविण्याचे ठरले. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद अध्यक्ष ऍड. सीमा वळवी यांनी पशुसंवर्धन विभागास तातडीने वीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देत, लसीकरण व उपचार शिबीर घेण्याचे आदेश दिले. उपलब्ध निधीतून पशुसंवर्धन विभागाने गोटपॉक्सच्या अडीच लक्ष मात्रा तसेच औषधोपचारासाठी गोचीड गोमाशा प्रतिबंधक औषधी घेण्यात आली असून तातडीने शिबिर घेण्याची कार्यवाही चालू असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. उमेश पाटील यांनी दिली. दरम्यान या मोहिमेचा भाग म्हणून आज तळोदा तालुक्यातील दलेलपूर येथे लंपीस्किन आजारावरील लसीकरण तसेच गोचीड गोमाशा प्रतिबंधक उपचार शिबिर घेण्यात आले. याप्रसंगी जि.प.अध्यक्षा ऍड. सीमा वळवी, जि.प. सदस्य तथा माजी उपाध्यक्ष सुहास नाईक, महेंद्र महाराज व गावातील पशुपालक उपस्थित होते.सदर शिबिरात जवळजवळ दीडशे गुरांना लसीकरण व औषधोपचार करण्यात आला. याप्रसंगी अड.सीमा वळवी म्हणाल्या की, पशुपालकांना जिल्हा परिषदेमार्फत सामान्य शेतकर्यांसाठी उपलब्ध केलेल्या लसीकरणाचा लाभ घेऊन, आपल्या पशूंचे रक्षण करावे. विशेष म्हणजे शेजारच्या जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील परिस्थिती पेक्षा लवकर निधी उपलब्ध करून दिली आहे.त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील पशुपालकांचे कमीतकमी नुकसान होऊ शकते असे सांगितले
तळोदा तालुक्यात ९ हजार ८००, धडगाव तालुक्यात १० हजार ५०० ,अक्कलकुवा तालुक्यात २६ हजार १५०, नंदुरबार तालुका २८ हजार १२, नवापूर तालुका ४६ हजार ३७९ व शहादा तालुक्यात १८ हजार ३०० असे जिल्ह्यात एकूण १ लाख ३९ हजार १४१ एवढ्या गुरांचे लसीकरण झाले आहे.दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील ३५९ गावात ११हजार २३७ गुरांमध्ये लंपीस्किन आजार आढळून आला असून त्यापैकी ९ हजार ५५१गुरे बरी झाली आहेत. पशुपालकानी आजारी पशूंना वेगळे बांधण्याची व त्यांचा चारा, पाणी वेगळे करण्याची आवश्यकता असून निरोगी जनावरांना गोचीड, गोमाशा प्रतिबंधक औषधोपचार करून घेण्याचे आवाहन देखील पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे. जनावरांचा गोठा देखिल गोचीड,गोमाश्यापासून मुक्त रहाण्यासाठी सायपर मेथ्रिन औषधाची फवारणी करून घ्यावी.असेही सूचित करण्यात आले आहे. यावेळी जि.प.च्या पशुसंवर्धन विभागामार्फत मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबविल्याने लेपे स्किन आजारावर नियंत्रण मिळवण्यात यश येत आहे. उर्वरित काळातही ही मोहीम सुरू राहणार असून जिल्ह्यातील पशुपालकांनी जाणीवपूर्वक लसीकरण करावे. असे सांगण्यात आले.दरम्यान दलेलपूर येथिल शिबिरासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील गोस्वामी, पशुधन विकास अधिकारी डॉ. विश्वास नवले तसेच डॉ. जमदाडे, डॉ. धनगर, डॉ. बहिरम यांनी परिश्रम घेतले.