नंदुरबार l प्रतिनिधी
ऐतिहासिक नंद गवळी राजा यांच्या नंदनगरीत संगणक आणि इंटरनेटच्या युगातही वीरशैव लिंगायत गवळी समाजातर्फे शेकडो वर्षापासून “सगर उत्सव” अर्थात गोवर्धन पूजनाची परंपरा आजही कायम आहे. म्हणून दरवर्षी दीपावली पाडवा व बलिप्रतिपदा निमित्त मुक्या प्राण्यांचा “सगर उत्सव” नंदनगरीचे आकर्षण ठरते. यावर्षी मंगळवार दि. 14 नोव्हेंबर रोजी “सगर” उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
गवळी समाज पंच मंडळातर्फे यंदा मोठ्या जल्लोषात सगर उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाभारत काळात भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून गवळी समाजाच्या पशुधनाचे संरक्षण केले होते. तेव्हापासून सगर उत्सवास प्रारंभ झाल्याचे जुने जाणकार सांगतात. एतिहासिक नंद गवळी राजा यांच्यावर नंदनगरीत गवळी समाज बांधव पारंपारिक दुग्ध व्यवसाया निमित्त स्थायिक आहेत. म्हणून गवळी समाज बांधव दीपावली सणाच्या आनंदोत्सवात सहभागी होतात. आगामी काळात आणि नववर्षात राज्यासह देशात आणि समाजात कुठलेही अघटीत संकट येऊ नये म्हणून गाई, म्हशी आणि रेडा यांचे पूजन करण्यात येते. पशुधन गवळी समाजाच्या उदर निर्वाहाचे साधन असले तरी गाय आणि म्हैस लक्ष्मीचे स्वरूप असून यमराजाचे वाहन रेडा यांचे पाडव्या निमित्त पूजन करण्यात येते.
नंदुरबारसह महाराष्ट्रात सर्वत्र वीरशैव लिंगायत गवळी समाज म्हैस व रेडा यांच्या माध्यमातून बंधुभाव जोपासत शेकडो वर्षापासून ही परंपरा आजही कायम आहे. दिवाळी पाडव्याला एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी समाज बांधव एकत्र येतात. या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे सगर अर्थात रेड्यांची मिरवणूक काढण्यात येते. गवळी समाज बांधव आपापल्या म्हशी आणि रेड्यांच्या शिंगांना मोरपिसे व झेंडूच्या माळा लावून त्यांच्या अंगावर रंगबेरंगी झुली कोरून सजवतात. प्रथा परंपरेनुसार अनेक वर्षांपासून शहरातील ऐतिहासिक मोठा मारुती मंदिर परीसरातील नगर परिषदेच्या कै. बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाजवळील सोनी विहीर चौकात सगर पूजन करण्यात येते. त्यानंतर नंदुरबार शहरातील गवळीवाडा, बालवीर चौक, देसाईपुरा परिसरातून गाई, म्हशी आणि रेड्यांची वाजत- गाजत मिरवणूक काढण्यात येते.
मंगळवार दि. 14 नोव्हेबर रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास सोनी विहिरी जवळ सगर उत्सवाला प्रारंभ होईल. या ठिकाणी गवळी समाजातील पंच मंडळी, मानकरी व समाज बांधव उपस्थित राहतील. सगर पूजनाच्या ठिकाणी रेडे सलामी देतात आणि म्हशी नतमस्तक होतात.मानकरी व पंचांच्या चर्चेनंतर उमद्या रेड्यांच्या झुंजी लावण्यात येतात. सर्व संमतीनेच रेड्यांच्या झुंजी होण्याची शक्यता आहे.
रेड्यांच्या झुंजी पाहण्यासाठी शहर व परिसरातील हौशी मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.आजच्या स्थितीत नंदुरबार येथे बोटावर मोजण्य इतक्या गवळी समाज बांधवांकडे पाळीव प्राणी आहेत. वाढत्या महागाईमुळे त्यांचे पालन पोषण करणे अवघड झाले आहे. “सगर” उत्सवाच्या माध्यमातून दरवर्षी रेड्यांच्या झुंजी प्रमुख आकर्षण ठरते.
“शिवशरणार्थ”चे महत्व
सगर पुजनादिवशी गवळी समाजाचे प्रमुख मानकरी आणि पंच मंडळी उपस्थित राहून आलेल्या गाई – म्हशी मालकांना “शिवशरणार्थ” संबोधुन स्वागत करतात. शिव शंकराला शरण जाण्याचा यातुन अर्थ बोध होतो. नंदुरबार येथील गवळीवाडा आणि तालुक्यातील वावद येथे गवळी समाज बांधव वास्तव्यास असल्याने दरवर्षी दीपावलीनिमित्त “सगर” ऊत्सवाची परंपरा दोन्ही ठिकाणी कायम आहे.
– महादू विठ्ठल हिरणवाळे,
जिल्हा कार्याध्यक्ष,
वीरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय संस्था, नंदुरबार.








