नंदूरबार l प्रतिनिधी
गांजाची शेती करणाऱ्यावर म्हसावद पोलीसांनी धडक कारवाई करीत 9 लाख 74 हजार रुपये किमंतीचा तब्बल 1 क्विंटल 39 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
9 ऑक्टोंबर रोजी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना माहिती मिळाली की, म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील बुरुमपाडा गावातील एका इसमाने त्याचे मक्कीच्या पिकाचे शेतात स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी बेकायदेशीररित्या मानवी मेंदुवर विपरीत परीणाम करणाऱ्या गुंगीकारक ओल्या गांजाची बेकायदेशीररीत्या लागवड करुन त्याची जोपासना करीत आहे.
पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत व म्हसावद पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक राजन मोरे तसेच त्यांचे एक पथक तयार करुन कारवाई करण्याचे आदेश दिले. शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत व म्हसावद पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक राजन मोरे तसेच अधिकारी व अमंलदार हे मिळालेल्या गोपनीय बातमी प्रमाणे बुरुमपाडा गावातील एका शेताजवळ आले. शेतात कौलारू घराजवळ मक्कीच्या पिकाचे शेतात दोन इसम हालचाली करत असल्याचे दिसुन आले. म्हसावद पोलीस ठाण्याचे पथक त्यांच्या दिशेने येत असल्याचे लक्षात येताच शेतातील दोन्ही इसमांनी तेथून पळ काढला, परंतु म्हसावद पोलीस ठाण्याच्या पथकांनी पळून जाणाऱ्या इसमांपैकी कोणसिंग आगरशा नाईक रा. नवे तोरणमाळ, बुरुममाळपाडा ता. शहादा यास अटक केली.
म्हसावद पोलीस ठाण्याच्या पथकाने मक्कीच्या पिकाचे शेताची पाहणी केली असता आतील बाजुस हिरवट रंगाचे गांजा सदृश्य झाडांची लागवड केल्याचे दिसुन आले, म्हणून म्हसावद पोलीस ठाण्याच्या पथकाने संपुर्ण शेती पिंजुन काढली असता संपूर्ण शेतातून 1 क्विंटल 39 किलो 14 ग्रॅम वजनाचे 9 लाख 73 हजार 980 रुपये किंमतीची गांजाची झाडे मिळुन आल्याने गांजाची झाडे गुन्ह्याच्या पुढील तपासकामी योग्य ती सर्व कायदेशीर प्रक्रिया करुन ताब्यात घेतली. तसेच कोणसिंग आगरशा नाईक यांच्याविरुद्ध म्हसावद पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम-1985 चे कलम 15(क),17(क), 18(क), 20 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. दत्ता पवार यांचे मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, म्हसावद पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक राजन मोरे, सहा.पोलीस उप निरीक्षक सुनिल पाडवी, रचना शिंदे, गुलाबसिंग पावरा, पोलीस हवालदार बहादूर भिलाला, भिमसिंग ठाकरे, किरण वळवी पोलीस अंमलदार राकेश पावरा, चंदू साबळे, रामसिंग सोनार, योगेश निकुंभ, सचिन तावडे, मिनाक्षी गावित, मेहली वळवी, प्रवीण पवार यांचे पथकाने केली.
तंबाखूजन्य व अंमली पदार्थांचे सेवन केल्याने स्वास्थ्यावर दुष्परिणाम होवून विविध प्रकारचे आजार होतात. तसेच अंमली | पदार्थांचे सेवन केल्यामुळे मनुष्याची आर्थिक, सामाजिक हानी होवून त्याचा परिणाम त्याच्या कुटुंबीयावर होत असतो. तसेच आजच्या तरुण पिढीने व्यसनापासून लांब राहून नंदुरबार जिल्हा अंमली पदार्थमुक्त कसा राहिल यासाठी प्रयत्न करावे. तसेच अंमली पदार्थ याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यास 9022455414 या हेल्पलाईन क्रमांकावर कळवावे. हेल्पलाईन क्रमांकाकावर माहिती देणाऱ्याचे नाव व पत्ता गोपनीय ठेवले जाते असे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात आले.