नंदुरबार l प्रतिनिधी
राज्याच्या सत्तेत राष्ट्रवादी सोबत आली यामुळे आता आम्ही ५० खोक्यांच्या आरोपातून मुक्त झालो आहोत. सध्या आम्ही एकत्र आहोत. मात्र पुढे काय होईल, सांगता येत नाही असे प्रतिपादन ज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात नंदुरबार तालुका विधायक समिती शिक्षण संस्था, बाजार समिती आणि विविध संस्थांच्यावतीने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी मंत्री पाटील बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, शिवसेनेचे संपर्क प्रमुख माजी आ.चंद्रकांत रघुवंशी, आ.राजेश पाडवी, आ.शिरीषकुमार नाईक, आ.किशोर दराडे, उद्योजक मनोज रघुवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे, जि.प.सदस्य विजय पराडके, धडगाव नगराध्यक्ष धनसिंग पावरा, नाशिक मनपाचे माजी सभापती श्री.गिते, शिवसेना तालुका प्रमुख डॉ.सयाजीराव मोरे, कृषी उत्पन्न बाजार समिती चेअमरन विक्रमसिंग वळवी, जि.प.सदस्य देवमन पवार, शेतकी संघाचे चेअरमन बी.के.पाटील, संचालक सुरेश शिंत्रे आदी उपस्थित होते. यापुढे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, डॉक्टर तीन वेळच्या गोळ्या देतो त्याप्रमाणे सध्या सकाळ, दुपार, संध्याकाळ असे शपथविधी झाले आहेत.
आता आम्ही तीन जण सत्तेत भागिदार आहोत. येत्या काळामध्ये राजकीय परिस्थिती कोणते वळण घेईल, हे सांगता येत नाही. मात्र, सध्या राज्याच्या विकासासाठी तिन्ही पक्ष मिळून राज्याचे हीत साधण्यासाठी एकत्र आलो आहोत. दरम्यान, राष्ट्रवादीचे मंत्री अनिल पाटील यांच्याकडे पाहून मिश्किलपणे गुलाबराव पाटील यांनी बरे झाले राष्ट्रवादी सोबत आली तर आमचे ५० खोके बंद झाले असे सांगताच एकच हस्यकल्लोळ माजला होता. तसेच राष्ट्रवादीत सध्या काय सुरु आहे समजायला मार्ग नाही, असेही श्री.पाटील म्हणाले. दरम्यान, हर घर नल योजना साकार करण्यासाठी केंद्र व राज्य तसेच लोक वर्गणीच्या माध्यमातून राज्यात ३७ हजार गावांना पाणी पुरवठा करण्याचे उद्दीष्ट आहे. जिल्ह्यात ज्या गावांनी पाणी योजनेची मागणी केली त्या मंजूर करण्यात आल्या आहोत. नंदुरबार जिल्ह्यात हर घर नळ पाणी पुरवठा योजनेचे काम धिम्या गतीने सुरु असून लोक प्रतिनिधींनी तालुका स्तरावर लक्ष दिल्यास २०२४ पर्यंत प्रत्येक घराला पाणी पुरविण्याचे स्वप्न साकार होऊ शकेल, असे विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला.
सध्या नंदुरबार, धुळे व जळगावसह राज्यातील काही भागांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही तर काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. पावसाळ्याच्या दोन महिन्यानंतर समाधानकारक पाऊस नसल्याने या भागातील धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा असून पाणी टंचाईची समस्या आहे. ऑगस्ट महिन्यात राज्य शासनाच्यावतीने आढावा घेण्यात येत असून त्या भागात दुष्काळसदृष्य परिस्थिती आहे त्या भागात राज्य सरकारकडून मदत उपलब्ध केली जाणार असल्याचे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे अजित पवार व शरद पवार यांच्या भेटीबाबत त्यांचे रक्ताचे नाते असून ते भेट घेतील त्यात गैर काही नाही. याआधीही ते भेटतच आले असेही मंत्री पाटील यांनी सांगितले. दरम्यान, माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी गेल्या ४० वर्षापासून पालिकेच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचे व्रत हाती घेतले आहे. नागरिकारंना चांगल्या आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी छत्रपती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची व्यवस्था केली आहे. गुहावटी येथील औद्योगिक प्रकल्प नंदुरबार येते आणण्याचा मानस असून त्या माध्यमाततून भविष्यात ५ हजार लोकांना उपलब्ध होणार आहे असे श्री.रघुवंशी यांनी सांगितले.
स्व.बटेसिंहभैय्या रघुवंशी यांची धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात राजकीय नाळ जुळली होती. त्यांचे कार्य नंदुरबारपुरते मर्यादीत न राहता सर्वत्र पोहचावे यासाठी प्रयत्न करावे. राजकीय, शैक्षणिक, सहकार क्षेत्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील आदिवासी आणि सर्व समाजाच्या विकासाठी बटेसिंहभैय्या रघुवंशी यांचे कार्य उल्लेखनिय असल्याचे मंत्री अनिल पाटील म्हणाले. स्व.बटेसिंह रघुवंशी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला उजाळा दिला.








