नंदुरबार l प्रतिनिधी
लोकशाही मुल्ये जोपासण्यासाठी देशभर लोकसभेत कॉँग्रेस उमेदवार निवडून यावेत, यासाठी चाचपणी सुरु करण्यात आली आहे. नंदुरबार लोकसभा मतदार संघात देखील याबाबत चाचपणी करण्यात आली असून यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. इच्छुकांपेक्षा लोकसभेत बाजी मारणाऱ्या उमेदवाराला कॉँग्रेस संधी देणार असल्याचे नंदुरबार लोकसभा पक्ष निरीक्षक माजी मंत्री वसंत पुरके यांनी सांगितले.
आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसकडून उमेदवारांची चाचपणी सुरु झाली आहे. त्याचाच एक भाग म्हूणून नंदुरबार येथे चाचपणीसाठी पक्ष निरीक्षक व प्रभारींची बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर श्री.पुरके यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यापुढे ते म्हणाले की, देशात लोकशाही मुल्ये पायदळी तुडविली जात आहेत. नागरिकांना हक्कापासून वंचित ठेवले जात आहे.
स्वत:चे विचार मांडण्यास मज्जाव केला जात आहे. यामुळे पुन्हा एकदा लोकशाही मुल्ये जोपासण्यासाठी कॉँग्रेसला सत्तेवर आणणे गरजेचे आहे. कॉँग्रेसचा उमेदवार निवडावा, यासाठी जीव की रान करणार आहोत. सामाजिक आणि आर्थिक क्रांती करण्यासाठी कॉँग्रेसला संधी देणे गरजेचे आहे. आज नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर चाचपणी केली. यास प्रतिसाद मिळाला. असे असले तरी लोकांच्या संपर्कात राहणाऱ्या उमेदवाराची व जिंकून येणाऱ्या उमेदवाराचीच कॉँग्रेस निवड करणार आहे, असेही श्री.पुरके यांनी सांगितले.
तसेच बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांना स्थान नसेल, असेही पुरके यांनी सांगितले. याप्रसंगी आ.शिरीष नाईक, माजी मंत्री ॲड.पद्माकर वळवी, नंदुरबार जिल्हा प्रभारी राजाराम पानगव्हाणे, रणजित पावरा, जेष्ठ नेते राजेंद्र पाटील, वसंतराव सुर्यवंशी, दिलीप नाईक उपस्थित होते.
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर चाचपणी घेण्यासाठी घेण्यात आलेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. यामध्ये पक्षाला उर्जित अवस्था प्राप्त करुन देण्यासाठी समन्वय असणे गरजेचे आहे. यामुळे प्रत्येकाने पदाधिकारी व कार्यकर्त्याने समन्वय ठेवावा, असे लोकसभा पक्ष निरीक्षक वसंत पुरके यांनी सांगितले.
लोकसभेसाठी कॉँग्रेसचे संभाव्य उमेदवार
चाचपणी बैठकीनंतर कॉँग्रेसच्या सुत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणूकीसाठी नंदुरबारमधून आ.ॲड.के.सी.पाडवी, आ.शिरीष नाईक, माजी मंत्री ॲड.पद्माकर वळवी, माजी जि.प.अध्यक्षा रजनी नाईक व ॲड.सिमा वळवी यांच्या नावांवर विचार करण्यात येणार असल्याचे सांगितले. यामुळे आता नेमके आता कॉँग्रेस भाजपासमोर तुल्यबळ उमेदवार म्हणून कोणाची निवड करणार? याकडे लक्ष लागून आहे.








