शहादा l प्रतिनिधी
महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनाखाली पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, शहादा येथे युवतींसाठी तीन दिवसीय राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण अभियानाचे उदघाटन झाले.
यावेळी उदघाटन प्रसंगी अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या सौ.जयश्री पाटील, सौ.माधवी पाटील, डॉ सौ. रुचिता पाटील होत्या तर प्रशिक्षणाचे वक्ते म्हणून पर्यटन मंत्रालय, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (महाराष्ट्र राज्य) यांचे नाशिक विभागाचे वैयक्तिक सचिव कल्पेश पाडवी, शहादा येथील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ स्मिता जैन, शहादा येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी फारुख शेख, संरक्षण अधिकारी पंकज बोरसे, प्राचार्य डॉ. एस.पी.पवार उपस्थित होते.
सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माँ सरस्वती, स्व.अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवर व प्रमुख वक्त्या डॉ स्मिता जैन यांनी भारतीय स्त्री शक्ती याविषयी मार्गदर्शन करताना सांगितले की, महिलांनी स्वतःचे स्व:संरक्षण कसे करावे याविषयी सांगितली त्याचबरोबर सध्या स्पर्धेचे युग आहे. म्हणजे आपणास संघर्ष करावा लागणार आहे युवती कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत हे त्यांनी सिद्ध केले आहे. शारीरिक व मानसिक दृष्ट्या भक्कम झाले पाहिजे. स्वतःची प्रगती करून आई-वडिलांचे व देशाचे नाव उज्वल केले पाहिजे. डॉ रुचिताताई पाटील यांनी सांगितले की, आपल्याशी कोणी जवळीक करीत असल्यास त्याचा उद्देश लक्षात आला पाहिजे. प्रेम, स्वैराचार, भिन्नलिंगी मैत्री स्वार्थी मैत्री यातील फरक समजून घ्यावा व कोणाच्याही जाळ्यात न पडता आपले करिअर करावे तसेच थोर स्त्रियांचा आदर्श घ्यावा. सौ. माधवीताई पाटील यांनी सांगितले की, मन मनगट व मस्तिष्क मजबूत करण्यासाठी विद्यार्थिनींनी अभ्यासाबरोबरच नियमित व्यायाम करून शरीर सुदृढ केले पाहिजे. न घाबरता संचार करण्यासाठी स्वावलंबी स्वाभिमानी बनले पाहिजे.
स्त्री ही आदिशक्ती आहे. दुर्गेचे रूप आहे याला साजेसे आपले वागणे जवळीक करीत असल्यास त्याचा उद्देश लक्षात आला पाहिजे. बघण्याचा दृष्टिकोन तसेच गुड टच – बॅड टच लक्षात घेऊन आपण स्वतः त्याकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे. वक्ते कल्पेश पाडवी यांनी सांगितले की, मैत्री वाढवताना व माध्यमांचा वापर करताना सजग राहिले पाहिजे. नसता त्याचे परिणाम दुसरेच होतात. पालकही याबाबतीत दुर्दैवाने बऱ्याचदा जागरूक नसतात बराती मागून घोडे मिरवण्यापेक्षा किंवा डिझास्टर मॅनेजमेंट करण्यापेक्षा अगोदरच सावधगिरी बाळगल्यास अनर्थ टळतो. सदर प्रशिक्षणाचे महत्त्व व सायबर क्राईम या विषयाची सविस्तर माहिती सांगितली.
कराटे प्रशिक्षक सेन्साई योगिता बैसाणे यांनी सांगितले की, आपल्या शरीराच्या हातापायांच्या वापर आपण बचावासाठी एक शस्त्र म्हणून कसा करावा याचेही प्रशिक्षण देण्यात आले त्याचप्रमाणे कराटे च्या सर्व प्रकारच्या किक्स, पंचेस, ब्लॉन्स, ब्लॉक्स अटॅक, विविध व्यायाम प्रकारात प्रशिक्षित करत प्रतिकार करण्याचे स्लाप फेस किक, बॅक पंच, फ्रंट कीक, क्रॉस पंच, साईड चाप, स्ट्रेट पंच (नाकावर मारणे), साईट पंच (जबड्यावर मारणे) व अपर कट (हनुवटीवर मारणे), सन ब्लॉक, ईस्ट मिडल किक, फॉरवर्ड चाप असे विविध कराटे व ज्यूडो प्रकार विद्यार्थिनींना प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी विद्यार्थीनींना विविध शॉर्ट ट्रिक्स दिल्या जेणेकरून विद्यार्थीनी तात्काळ त्यांचे संरक्षण स्वतः करतील. त्याचप्रमाणे शारीरिक तंदुरुस्तीसाठी व्यायाम करणे ही आवश्यक असून विद्यार्थीना स्व:संरक्षण कसे करावे यासाठी प्रात्यक्षिक करून दाखवले तसेच जर कोणी हल्ला केला तर कशा पद्धतीने आपण आपला बचाव करावा याचेही प्रात्यक्षिक करून दाखवले.
सदर प्रशिक्षणात एकूण 200 पेक्षा जास्त विद्यार्थिनीनी सहभाग नोंदवला होता. सदर कार्यक्रमासाठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, मानद सचिव श्रीमती कमलताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील, प्राचार्य डॉ.एस.पी.पवार यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मानसी धनकानी यांनी केले तर आभार प्रा.अमृता पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्रा.डॉ.सुनिला पाटील, प्रा.माधुरी पवार, प्रा.सुलभा पाटील, प्रा.अमित धनकानी, प्रा.आकाश जैन, प्रा.हितेंद्र चौधरी, प्रा.दिवाकर पाटील, प्रा.आझम शेख, प्रा. समीर शेख, प्रा.प्रिया चौधरी व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.