म्हसावद l प्रतिनिधी
आदिवासी आश्रम शाळांमध्ये नवीन वेळापत्रक लावू नये ,जुनेच वेळापत्रक कायम ठेवण्यात यावे,अशी मागणी बिरसा फायटर्सचे राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे ही मागणी जिल्हाध्यक्ष भरत पावरा कार्याध्यक्ष संतोष वळवी प्रसिध्दी प्रमुख जलिंदर पावरा तालुकाध्यक्ष संदीप रावताळे पुणे जिल्हाध्यक्ष कृष्णा भंडारी या पदाधिकारी यांनी केल आहे.
निवेदनात म्हटले आहे की,आदिवासी विभागाने आश्रम शाळेसाठी नवीन वेळापत्रक शासन निर्णय काढून लागू केले आहे. नवीन वेळापत्रक आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहे.सन 2023-24 पासून नवीन सत्रात आदिवासी विकास विभागाने नवीन वेळापत्रक आदिवासी विद्यार्थ्यांसाठी तयार केले आहे.हे वेळापत्रक विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे आहे,म्हणून जुनेच वेळापत्रक कायम ठेवण्यात यावे.नवीन वेळापत्रकानुसार दोन सत्रात शाळा भरणार आहे.यामध्ये सायंकाळी 6.30 वाजता विद्यार्थ्यांना जेवण मिळणार आहे.तर पुन्हा दुस-या दिवशी दुपारी 11.30 वाजता जेवण दिले जाणार आहे.
दोन जेवणातील 18 तासांचे अंतर आहे.त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना 18 तास उपाशी राहावे लागणार आहे.सकाळी 7 ते सायंकाळ 6 असे एकूण 13 तासांचे शालेय सत्र आहे.सकाळी 5 वाजता विद्यार्थ्यांना जागे करून प्रार्थना व रात्री 9.30 पर्यंत हे निवासी वेळापत्रक राहणार आहे.त्यामध्ये प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना हे अवघड वेळापत्रक झेपणार नाही. यामध्ये आदिवासी लहान बालकांची उपासमार होईल. याचा विचार केला जावा.केवळ शिक्षक कर्मचारी वेळेवर येत नाहीत म्हणून हे वेळापत्रक तयार केले आहे,असे दिसते.हा आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय आहे.
महाराष्ट्र भर शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व जिल्हा परिषदसह सकाळी 11 ते सायंकाळ 5 पर्यंत शाळा आहे.हीच वेळ अध्ययन अध्यापनासाठी योग्य आहे.यामध्ये सकाळी 10 वाजता जेवण, 11 वाजता शाळा ,दुपारी मधल्या सुट्टीत नाश्ता व सायंकाळी 5 वाजता सुट्टी,असे नेहमीचेच 11 ते 5 चे आदिवासी आश्रम शाळेचे सध्या सुरू असलेले वेळापत्रक कायम ठेवावे,विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन आश्रम शाळेत जुनेच वेळापत्रक कायम ठेवण्यात यावे व नवीन वेळापत्रक लावू नये,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून शासनाकडे करण्यात आली आहे.