नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील खांडबारा येथील रहिवासी व नंदुरबार जिल्ह्यातून प्रथम सनदी अधिकारी होण्याचा मान पटकावलेले चंद्रकांत रावजी वळवी यांची मुख्य आयुक्त (जीएसटी प्रिंसिपल कमिशनर) पदी बढती करण्यात आली आहे.
गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे विक्री व सेवाकर उपमुख्य आयुक्त म्हणून कार्यरत असलेले चंद्रकांत वळवी हे नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा तालुका नवापूर येथील रहिवासी असून. सर्वप्रथम आयकर निरीक्षक म्हणून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांनी सन 1991 मध्ये यश संपादन केले होते. त्यानंतर सनदी अधिकारी होण्याच्या ध्येयाने त्यांनी संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन त्यात यश संपादन केले.
भारतीय महसूल सेवा संवर्गात विविध पदांवर त्यांनी यशस्वीपणे कारभार सांभाळला आहे. ते सध्या गुजरात राज्याचे उपमुख्य वस्तू व सेवा कर आयुक्त (जीएसटी) या पदावर कार्यरत आहेत. कामाप्रती असलेली त्यांची निष्ठा आणि काम करण्याची सचोटी यामुळे त्यांची नुकतीच केंद्र शासनाने मुख्य आयुक्त या पदावर नियुक्ती केली आहे.