नंदुरबार l प्रतिनिधी
बालनाट्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यातील नाट्य चळवळीला गती प्राप्त झाली असून या बालनाट्य प्रशिक्षणातील बाल कलावंत भविष्यातील नाट्य कलावंत आहेत असे मत जळगाव येथील बालनाट्य प्रशिक्षक, लेखक, दिग्दर्शक हनुमान सुरवसे यांनी व्यक्त केले.
गाडगेबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळ, शिंदे व बालरंगभूमी परिषद नंदुरबार जिल्हा शाखा आयोजित अभिनयाची पाठशाळा अंतर्गत हसत-खेळत बालनाट्य प्रशिक्षण शिबिराची सांगता येथील एस.ए.मिशन हायस्कूल व जुनिअर कॉलेज येथे ‘झपाटलेली चाळ’ या बालनाट्य सादरीकरणातून करण्यात आला. या वेळी संपन्न
झालेल्या समारोपीय कार्यक्रमात नंदुरबार जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी, एस.ए.मिशन हायस्कूलचे उपमुख्याध्यापक विजय पवार, पर्यवेक्षक मीनल वळवी, सरदार वल्लभभाई पटेल मंडळचे अध्यक्ष शीतल पटेल, उद्योजक अशोक चौधरी, जळगांवचे जय सोनार,रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे सचिव किरण दाभाडे, लिटरसी चेअरमन सैय्यद इसरार अली आदी उपस्थित होते. एकूण दहा दिवस सुरु असणाऱ्या या बालनाट्य प्रशिक्षणशिबिरात एकूण ३० बाल कलावंतांनी सहभाग घेतला होता. हनुमान सुरवसे लिखित ‘झपाटलेली चाळ..!!’ या बालनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. या बालनाट्यात एकूण ३० बाल कलावंतांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त अभिनय केला नाट्य रसिकांची दाद मिळविली.
या वेळी बाल कलावंत युगंधरा चौधरी, मोहित ठाकरे, अर्णव चौधरी, तनिष्का पेंढारकर, दिया सूर्यवंशी, धारा गोल्हाईत यांनी प्रशिक्षणाबाबत मनोगत व्यक्त केले तर पालकांच्या वतीने नंदकिशोर सूर्यवंशी, श्वेता चौधरी, मनोज चौधरी, प्रतिपाल मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले. समारोपाप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते बाल कलावंतांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. नागसेन पेंढारकर यांनी या वेळी लवकरच मोठ्यांसाठी नाट्य प्रशिक्षण शिबीर व येत्या वर्षात निवासी बालनाट्य प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे असे जाहीर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालरंगभूमी परिषद नंदुरबार जिल्हा शाखेचे अध्यक्ष राजेश जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारनाट्यकर्मी नागसेन पेंढारकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नाट्यकर्मी मनोज सोनार, जितेंद्र खवळे, चिदानंद तांबोळी, पार्थ जाधव, तुषार सांगोरे, जितेंद्र पेंढारकर, तुषार ठाकरे आदींनी परिश्रम घेतले. बालनाट्य सादर करतांना मुला-मुलींचा दांडगा उत्साह होता. तसेच बाल कलावंतांचा उत्साह वाढविण्यासाठी पालकांची व रसिक प्रेक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.








