नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर शहरातील सोने व्यापाऱ्याकडून दोन सोन्याच्या अंगठ्या घेवून दुकानातील क्यूआर कोड स्कॅन करुन सक्सेस झाल्याची बतावणी करुन खात्यात पैसे न टाकता सोन्याच्या अंगठ्या घेवून ४४ हजार रुपयात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,नवापूर शहरातील संदिप बाबुराव दुसाने यांचे गोपाळ ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. सदर दुकानात एक अनोळखी इसम येऊन सोन्याच्या अंगठ्या दाखवा असे सांगून प्रत्येकी ४ ग्रॅम प्रमाणे एकूण ८ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या आवडल्याच्या सांगून दोन्ही सोन्याच्या अंगठ्या घेतल्या मात्र अनोळखी इसमाकडे रोख रक्कम नसल्याने त्याने दुकानातील क्यूआर कोड स्कॅन करुन पैसे सक्सेत झाल्याची संदिप दुसाने यांना बतावणी केली.
मात्र खात्यात पैसे न टाकता ४४ हजार रुपयात फसवणूक करुन पसार झाला. याबाबत संदिप दुसाने यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात अनोळखीविरोधात भादंवि कलम ४२० सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (क) ६६ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल कर ण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे करीत आहेत.








