नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील नागसर येथे होणारा बालविवाह रोखण्यासाठी गेलेल्या पथकाला विरोध करत पोलीसांना धक्काबुकी केली.तसेच शासकीय वाहनाची तोडफोड करुन पोलीसांच्या अंगावर धावून येत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी जमावाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील नागसर येथे बालविवाह होणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती.त्यानुसार नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे हे पथकासह दि.१२ मे रोजी दुपारी ११ ते १२ वाजेच्या सुमारास नागसर येथे रवाना झाले.
याप्रसंगी बालविवाह करु नये असे आवाहन पोलीस पथकाच्या वतीने करण्यात आले.यावेळी तेजमल रमेश पवार, पिंट्या रोहिदास चव्हाण(दोन्ही रा.बद्रीझिरा,ता.नंदुरबार), कनिलाल रजेसिंग पवार(रा.नागसर) यांच्यासह सुमारे १५ ते २० जणांनी बेकायदेशीररित्या जमाव जमवून पोलीस अधिकारी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुकी करण्यात आली.तसेच शासकीय वाहने फोडून पोलीस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे व पोना.विनायक सोनवणे यांना मारहाण करण्याची धमकी दिली व अंगावर धावून गेले.दरम्यान, जमावाच्या धक्काबुकी त विनायक सोनवणे व पोलीस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे जखमी झाले आहेत.
याबाबत पोना विनायक सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन संशयित तेजमल पवार, पिंट्या चव्हाण, कनिलाल पवार यांच्यासह सुमारे १५ ते २० जणांच्या जमावाविरुध्द नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात भांदवि कलम ३५३,३३२,१४३,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार करत आहेत.








