नंदुरबार l प्रतिनिधी
पंतप्रधान जीवन ज्योती विमा आणि सुरक्षा विमा योजनेअंतर्गत वार्षिक केवळ 330 रुपये आणि 12 रुपये भरून सुमारे दोन लाख रुपयांचा विमा प्राप्त होणार आहे.या दोन्ही विमा योजनेचा लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री आणि जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक सचिन गांगुर्डे यांनी केले आहे.
याबाबत प्रसिद्धीच दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत वर्षभरासाठी मुदत जीवन विमा योजना संरक्षण राहील ज्याचे दर वर्षी नूतनीकरण करणे आवश्यक आहे. या योजनेत लाभार्थ्याचा कोणत्याही कारणामुळे झालेल्या मृत्यूसाठी दोन लाख रुपये मिळतील. या योजनेचा विमा प्रीमियम हा दर वर्षाला 330 रुपये राहील. प्रत्येक वर्षात जोपर्यंत योजना चालू आहे तोपर्यंत खातेधारकाच्या बचत खात्यातून परस्पर रुपये काढण्याच्या निर्देशानुसार एकदाच योजनेत सहभागी होताना पर्याय निवडला जाईल. याचबरोबर वय वर्ष 18 ते 50 वयोगटातील सहभागी बँकातील सर्व बचत खातेधारक या योजनेसाठी पात्र राहतील.
एकाच वेळी अनेक बँकात खाते असणाऱ्या ग्राहकाला फक्त एकच बचत खात्यामार्फत या योजनेत सहभागी होता येईल. या योजनेत विमा संरक्षण हे दि. 1 जून ते 31 मे या काळात एक वर्षासाठी राहील. त्यासाठी स्वीकृती नमुन्यात परस्पर रुपये जमा करण्याचे समिती पत्र हे आवश्यक असून दरवर्षी 31 मे पर्यंत प्रीमियम भरता येईल. त्याची वाढीव मुदत 31 ऑगस्ट ही वर्षासाठीच राहील. यानंतर सहभागी होणाऱ्या वर्गणीदार यांना पूर्ण वार्षिक प्रीमियम द्यावे लागेल आणि स्वतः दिलेले स्वतःचे निरोगी असल्याचा दाखला द्यावा लागेल. नैसर्गिक आपत्ती जसे की भूकंप, पूर इत्यादीमुळे होणारे मृत्यू अपंगपणा या कारणांना ही योजना कव्हर करणार आहे.
पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेअंतर्गत केवळ 12 रुपये मासिक प्रीमियम मध्ये सुमारे दोन लाख रुपयांचा विमा लाभार्थ्यांना मिळणार आहे.यात नैसर्गिक मृत्यू किंवा दोन्ही डोळे, दोन्ही हात, दोन्ही पाय पूर्णपणे गमावणे अथवा एका डोळ्याची नजर, एक हात एक पाय गमावणे दोन लाख रुपये तसेच एका डोळ्याची नजर, एक हात एक पाय संपूर्ण बने गमावणे यावर एक लाख रुपये लाभार्थ्यास देण्यात येईल.दोन्ही विमा योजना कुठल्याही राष्ट्रीयकृत बँक खात्यातील खातेदार आणि जॉईंट खातेदार यांना लागू असेल.अल्प किमतीत प्राप्त होणाऱ्या विमा योजनेचा नंदुरबार जिल्ह्यातील सर्व बँक खातेदारांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री आणि अग्रणी बँकेचे प्रबंधक सचिन गांगुर्डे यांनी केले आहे.








