शहादा l प्रतिनिधी
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा जिल्हा नंदुरबार येथील भूगोल विभागातील प्रा. डॉ.प्रशांत आर.तोरवणे यांची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या भूगोल अभ्यास मंडळावर कुलगुरू नामनिर्देशित सदस्य म्हणून पुढील पाच वर्षासाठी निवड झाली आहे.
प्रा.डॉ.प्रशांत तोरवणे हे येथील पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाच्या वरिष्ठ महाविद्यालयात भूगोल विभागात गेल्या १४ वर्षापासून सेवारत आहेत. डॉ.तोरवणे यांनी आतापर्यंत ६८ पेक्षा जास्त विद्यापीठ, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चासत्र व परिषदेत सहभाग नोंदवला आहे. तसेच त्यांचे २० पेक्षा अधिक संशोधन पेपर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित झालेले आहेत.
त्याचबरोबर सहा पुस्तके देखील प्रकाशित झाले असून ते पीएचडी चे संशोधन मार्गदर्शकही आहेत. त्यांच्या अंतर्गत दोन विद्यार्थी पीएचडीचे संशोधन करीत आहेत. डॉ.तोरवणे यांनी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी विकास अधिकारी म्हणून यशस्वी रित्या कामकाज पाहिले आहे. त्यांनी आतापर्यंत विद्यापीठ व महाविद्यालय स्तरावरील विविध समितीचे कामकाज यशस्वीपणे केले आहे.त्यांच्या या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील, प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील आदींनी अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.









