नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील ज्येष्ठ पत्रकार रवींद्र वेडु चव्हाण यांनी आपल्या जन्मभूमी असलेल्या नंदुरबार तालुक्यातील काकर्दे गावाच्या ग्रामविकासाची संकल्पना मांडून आपले ग्रामविकास म्हणून आदर्श गाव निर्माण व्हावे, यासाठी पत्रकार स्व.रवींद्र चव्हाण यांचे देखील योगदान राहिले आहे. गावाच्या विकासासाठी सदैव कार्यतत्पर असलेले पत्रकार रवींद्र चव्हाण यांचे शनिवारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. आपल्या भूमिपुत्राच्या स्वप्नातील गावाच्या विकासासाठी ग्रामविकासाची संकल्पना हा उपक्रम काकर्दे ग्रामपंचायतीने ज्येष्ठ पत्रकार स्व. रवींद्र चव्हाण यांना अनोखी श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या स्वप्नातील गावाच्या विकासासाठी पाणी वितरणाच्या कालावधीचे लोकार्पण करण्यात आला.
नंदुरबार शहरापासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर काकर्दे हे गाव आहे. काकर्देचे भूमिपुत्र असलेले रवींद्र चव्हाण हे गेल्या पंचवीस वर्षांपूर्वी नंदुरबारात येऊन त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. आदिवासी बहुल जिल्ह्यात असलेल्या नंदुरबार या जिल्ह्याच्या ठिकाणी पत्रकार रवींद्र चव्हाण यांनी आपल्या लेखणीतून आगळीवेगळी ओळख निर्माण करीत समाजकार्यातही नेहमी अग्रेसर राहिले. ज्या गावात आपण जन्मलो त्या गावाचा कायापालट व्हावा प्रगती व्हावी विकास व्हावा हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून पत्रकार रवींद्र चव्हाण यांनी नेहमी गाव विकासाच्या कार्यात योगदान दिले आहे.
गावातील प्रत्येक व्यक्तीच्या कामात रवींद्र चव्हाण हे नेहमी कार्यतत्पर राहिले. आपल्याकडे आलेल्या व्यक्तीचे काम करावे व त्याचे समाधान व्हावे या दृष्टिकोनातून कार्य करणारे पत्रकार रवींद्र चव्हाण हे गावातील व शहरातील तरुणांसोबतच ज्येष्ठ व्यक्तींचे ‘रविभाऊ’ बनले. का करते गाव ग्रामविकासात येऊन या गावाची प्रगती व्हावी, असे स्वप्न बाळगून असलेले रवींद्र चव्हाण यांनी गावात समन्वयही घडून आणला. गावाशी आपले नाते असते, त्याची प्रचिती आधी ग्रामस्थांच्या रविभाऊंबद्दल असल्या प्रेमातून दिसून येते. गेल्या काही वर्षांपासून काकर्दे ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी समन्वय घडवून आणण्यात देखील पत्रकार रवींद्र चव्हाण यांचे योगदान आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही, कारण याचे साक्षीदार अनेक जण आहेत व असतील. ग्रामविकासाचे संकल्प पाहणाऱ्या आपल्या गावाच्या सुपुत्राचे दुर्दैवी निधन होणे ही घटना काकर्देकरांच्या मनाला चटका लावून गेली. या दुःखाच्या सागरात असताना आपल्या गावाच्या भूमिपुत्राला अनोखी श्रद्धांजली अर्पण करावी या उद्देशाने काकर्दे ग्रामपंचायत च्या वतीने स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार रवींद्र चव्हाण यांच्या स्मरणार्थ ग्रामविकास संकल्पना हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
रविवारी पत्रकार रवींद्र चव्हाण यांच्या स्वप्नातील गावाच्या विकासासाठी पाणी वितरणाच्या कालावधीचे लोकार्पण काकर्देचे माजी सरपंच रवींद्र बागुल व विद्यमान सरपंच पुंडलिक भापकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकार रवींद्र चव्हाण यांच्या जीवन कार्याला उजाळा देऊन उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. का काकर्दे ग्रामस्थांनी राबविलेल्या या उपक्रमातून स्वर्गीय रवींद्र चव्हाण यांच्या विषयी आपुलकीची भावना व्यक्त करण्यात आले आहे, हे विशेष. यातून रवींद्र चव्हाण यांनी आपल्या प्रेमळ बोलीतून प्रत्येकाच्या मनात घर केले असून हीच त्यांची खरी कमाई आहे, असे म्हटल्यास त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.