नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील महिला व बाल विकास विभागांतर्गत महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणा-या समाजसेविकांच्या व संस्थांच्या कामाची दखल घेवून, त्यांना प्रोत्साहीत करण्याच्या दृष्टीकोनातून नंदुरबार तालुक्यातील भोणे येथील आशा माळी व शहादा शहरातील गुजर गल्लीतील कांताबेन काशिनाथ पाटील यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात महिला व बाल विकास कार्यालयातर्फे मार्फत सन २०१४-१५ व २०१७-१८ या वर्षाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण रंगावली सभागृहात करण्यात आले. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते निवड झालेल्या समाज सेविकांना १० हजार रोख, स्मृती चिन्ह, सन्मानचिन्ह, शाल श्रीफळ, जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. नेटवर्क ऑफ बाय पिपल, लिव्हींग विथ एचआयव्ही या संस्थेच्या अध्यक्षा भोणे येथील आशा माळी यांनी एचआयव्ही झालेल्या महिला, पुरुष व मुलांना, ज्यांना समाजाने नाकारले आहे. अशा दुर्लक्षीत घटकासोबत भरीव कामगिरी केल्याने त्या कामाची दखल घेवून शासनाने, त्यांना सन २०१४-१५ या वर्षाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी निवड केलेली आहे.

शहादा शहरातील गुजर गल्लीतील कांताबेन काशिनाथ पाटील यांची निवड शासनाकडुन करण्यात आलेली आहे. त्या शहादा नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा आहेत. गरजू, पिडीत महिलांसाठी चांगले काम केलेले असल्याने त्या कामाची दखल
घेवून शासनाने सन २०१७-१८ या वर्षाकरिता त्यांचीपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी निवड केलेली आहे.कार्यक्रमास महिला व बाल विकास अधिकारी राजेंद्र बिरारी, जिल्हा परिविक्षा अधिकारी गिरीष जाधव, संरक्षण अधिकारी . रविंद्र काकळीज, लेखा अधिकारी अशोक जगताप, पर्यवेक्षक अधिकारी विजय लोखंडे, सुरेखा पवार, सुनिल पवार, व बाल संरक्षण कक्षाचे कर्मचारी उपस्थित होते.