नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील गरजू जेष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेली विनामूल्य घरपोच टिफिन सेवा खरोखरच कौतुकास्पद असून सदर कार्य पुढे सुरू राहावे यासाठी शुभेच्छा देत असल्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी मीनल करणवाल यांनी ज्येष्ठ नागरिक घरपोच टिफिन सेवा शुभारंभ प्रसंगी सांगितले.
शहरातील एम.एल. टाऊन जवळील स्वागत भोजनालय येथे ज्येष्ठ नागरिक अन्नपूर्णा सेवा समिती मार्फत शहरातील गरजू जेष्ठ नागरिकांना विनामूल्य घरपोच टिफिन सेवा या कार्याच्या शुभारंभ श्रीराम नवमी निमित्त सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करणवाल यांच्या अध्यक्ष खाली करण्यात आला . तर शुभारंभ समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डी.जी. नांदगावकर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी ॲड. राजेंद्र पंडित, डॉ तेजल चौधरी, सुलभा महिरे, जयप्रकाश अग्रवाल, सुरेश अग्रवाल, बारकू पाटील, आत्माराम इंदवे, श्रीनिवास चौधरी, अजय भाईवारा, रतनलाल अग्रवाल ,संजय अग्रवाल ,गौरव अग्रवाल, मीनल मसावदकर आदी उपस्थित होते.
ज्येष्ठ नागरिक अन्नपूर्णा सेवा समितीमार्फत शहरातील ज्या ज्येष्ठ नागरिकांना आधार नाही किंवा त्यांचे पाल्य कामानिमित्त बाहेर आहेत अशा व इतर अडचणी आहेत अशा गरजू जेष्ठ नागरिकांना दोन वेळचे जेवण मिळावे या उद्देशाने सदर टिफिन सेवा सुरू करण्यात आली आहे या टिफिन सेवेत ५ पुरुष १३ महिला असे एकूण १८ ज्येष्ठ नागरिकांना टिफिन सेवा सुरू करण्यात आली आहे. यासाठी त्यांच्या घरी जाऊन खरोखर गरज असलेल्या व्यक्तींना निवडण्यात आले आहे. दानशूर व्यक्ती ही सेवा पुढे चालू ठेवण्यासाठी मदत करीत राहतील अशी माहिती समितीचे सचिव बारकू पाटील यांनी दिली आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या या घरपोच टिफिन सेवेसाठी आई-वडील यांच्या वाढदिवस ,स्मृतिदिन, लग्नाच्या वाढदिवस किंवा अन्य शुभ कार्यानिमित्त कोणीही यासाठी मदत करू शकतात. अशी माहिती सेवा समितीचे अध्यक्ष जयप्रकाश अग्रवाल
यांनी दिली आहे. यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश अग्रवाल यांनी केले सूत्रसंचालन आत्माराम इंदवे यांनी केले बारकू पाटील यांनी आभार मानले.