नंदुरबार| प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील बायपास रस्त्यावरील खड्डयांनी गेल्या वर्षभरात अनेकांचे जीव घेतले आहे. याबाबत अनेकदा मागणी करूनही संबंधित विभागाने याबाबत कुठलीही कारवाई केलेली नाही. येत्या आठ दिवसात सदर खड्डे न बुजविल्यास पिडीतांच्या नातेवाईकांसह सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा भाजपाचे नेते डॉ.विक्रांत मोरे यांनी दिला.
नंदुरबार येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पुढे ते म्हणाले की, नंदुरबार शहरातील बायपास रस्त्यांवर भलेमोठे खड्डे पडून रस्ता हा नादुरूस्त गेल्या अडीच वर्षात या खड्डयांमुळे २० पेक्षा अधिक जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे.
अनेकदा मागणी करूनही एनएचएआयकडून साधी डागडुजीही झालेली नाही. हा रस्ता त्यांचा हद्दीत येतो. संबंधित अधिकारही कुंभकर्णाच्या निद्रेत असून त्यांना जाग करण्यासाठी आठ दिवसाचा आत सदरचा रस्ता दुरूस्त न झाल्यास या अडीच वर्षात मृत्यूमुखी झालेल्या नागरीकांच्या कुटूंबांसमवेत पोलीस ठाण्यात संबंधित अधिकार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार आहोत.
केंद्रीयमंत्री ना.नितीन गडकरी यांनी पुर्ण देशात चांगले काम करत आहेत. मात्र महाराष्ट्रात काही निर्लज्ज अधिकार्यांमुळे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे नाव खराब होत आहे. संपूर्ण देशात रस्त्यांचे जाळे उभारतांना अधिकार्यांना फक्त महाराष्ट्राचा विसर पडल्याचा दिसतो. असा एकंदर चित्र आहे. येत्या आठ दिवसात रस्ता दुरूस्त न झाल्यास संबंधित अधिकार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार आहोत असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक चारूदत्त कळवणकर, रिपाई आठवले गट युवाजिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील, भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र माळी यांच्यासह या रस्त्यावर मयत झालेल्यांचे नातेवाईक उपस्थित होते.