नंदूरबार l प्रतिनिधी
स्वतंत्र भारतात होणारे पहिले आदिवासी महिला साहित्य संमेलन गडचिरोली येथे 15 व 16 एप्रिल 2023 ला होणार आहे. या अनुषंगाने कुसुम ताई अलाम यांचा झंझावात निर्माण करणारा दौरा महाराष्ट्रात सुरू असुन संमेलनाची माहिती देण्यासाठी त्यांनी नंदुरबार जिल्ह्याचा दौरा केला आहे.
संमेलनाचा मुख्य उद्देश समाजातील लोकांना पटवून देण्यासाठी अहोरात्र मेहनत करत आहेत. आदिवासी अस्तित्व, अस्मिता, ज्ञान, परंपरा, कला, आदिवासी महानायकांचा इतिहास याची माहिती देणे, मनुवादी, विषमतावादी विचारांचा पर्दाफाश करणे, संविधानिक अधिकारांची जागरूकता निर्माण करणे. आणि आपल्या हक्काचा आवाज बुलंद करणे हा उद्देश आहे.
समतामुलक आदिवासी समाजात स्त्रीचे स्थान महत्त्वाचे आहे. आदिवासी हे सर्वश्रैष्ठ पर्यावरणवादी निसर्ग पुजक आहेत. या समाजाला मनुवादी विषमतावादी विचारसरणीचा धोका निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस आदिवासींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नक्षली कारवाया, अत्याचार, शोषण, बलात्कार या घटना वाढीस लागल्या आहेत. यासाठी कुसुम ताई अलाम यांनी 23 आक्टोबर 2016 ते 13 जानेवारी 2017 दरम्यान तीन महिने सलग महिला बाल सन्मान यात्रा नऊ राज्यांतून काढली होती. दरवर्षी वेगवेगळ्या राज्यांमध्ये महिलांवरील समस्यांवर चर्चा केली जाते.
आदिवासी जाती नसून ते जमाती आहेत. संविधान अनुच्छेद 244 अनुसार पाचवी आणि सहावी अनुसूची क्षेत्र आदिवासी साठी राखीव आहेत. जल, जंगल, जमीन, खनिज संपत्तीचे अधिकार आदिवासीचे आहेत. यावर या स़मेंलनात चर्चा होणार आहे. या साहित्य संमेलनाकडे साहित्याचे अभ्यासक, संशोधक व अनेक राज्याचे लक्ष लागून आहे. संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. स्ट्रीमलेट डखार मेघालय आणि उद्घाटक सुप्रसिद्ध साहित्यिक तथा सामाजिक कार्यकर्ता नजुबाई गावित धुळे या आहेत.
विशेष अतिथी संयुक्त राष्ट्र संघाचे इंडिजिनस पिपल्स माजी अध्यक्ष फुलमनजी चौधरी, संयुक्त राष्ट्र संघाचे भाषा विभाग प्रमुख बेंजामिन बारा, जयपालसिंग मुंडा पुस्तकाचे लेखक तथा माजी सनदी अधिकारी रुपचंद वर्मा नोएडा, ममता कुजुर छत्तिसगड, सुप्रसिद्ध संथाली कवयित्री निर्मला पुतुल, विविध क्षेत्रातील मान्यवर, साहित्यिक, अभ्यासक हजेरी लावणार आहेत.
हे साहित्य संमेलन ऐतिहासिक ठरणार आहे. सदर संमेलना बद्दल माहिती देण्यासाठी कुसुमताई अलाम यांनी नंदुरबार जिल्ह्याचा दौरा केला. दरम्यान राज्याच्या आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचीही भेट घेऊन त्यांनी महिला साहित्य संमेलना बाबत अधिक माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत मंगला कुळसंगे, कृष्णादास गावित, बि.ई. वसावे, मालती वळवी, भगतसिंग पाडवी, सुहास नाईक, झेलसिंग पावरा, रेखाताई पाडवी, सुमित्रा वसावे, शितल वसावे, संगिता पाडवी आदी उपस्थित होते.