नंदूरबार l प्रतिनिधी
डॉ.एपीजे अब्दुल कलाम सॅटेलाईट लॉन्च व्हिकल मिशन २०२३ हा महत्वाकांक्षी प्रकल्प भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्वप्नपूर्तीसाठीचे एक पाऊल आहे. सन २०२०-२१ मध्ये केलेल्या ‘डॉ.एपीजे अब्दुल कलाम पे-लोड क्यूबज चॅलेंज’ या प्रकल्पाचा पुढील टप्पा आहे. हा प्रकल्प हाऊस ऑफ कलाम येथील चालविल्या जाणाऱ्या डॉ.एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनकडून व स्पेस झोड इंडिया आरि मार्टिन ग्रुप यांंचे द्वारा राबविला जात आहे.
यात नंदुरबार जिल्ह्यातील वेली, कोठार व जळखे आश्रमशाळांतील प्रत्येकी 2 विद्यार्थी, माध्यमिक विद्यालय खैरवे च्या 2 विद्यार्थीनी, एकलव्य विद्यालय, के. आर. पब्लिक स्कूल व सार्वजनिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय, नवापूर चे प्रत्येकी 1 आणि श्रीराम कोचिंग क्लासेस, नंदुरबार चे 4 असे एकूण 16 बाल वैज्ञानिक सहभाग नोंदविणार असून यातून जागतिक विक्रम होणार आहे. यामुळे तापी खोर्यातील नंदुरबार जिल्ह्याच्या नामांकनात मानाचा तुरा रोवला जाणार आहे.
डॉ.एपीजे अब्दुल कलाम सॅटेलाईट लॉन्च व्हिकल मिशन २०२३ या प्रकल्पात विद्यार्थ्यांचे उपग्रह बनविण्याचे ऑनलाईन प्रशिक्षण झाले . तसेच प्रत्यक्ष पिको उपग्रह (लघु उपग्रह, ज्याचे वजन 70 ते 150 ग्रॅम) बनविण्यासाठी कार्यशाळा पुणे, परभणी आणि नागपूर येथे घेण्यात येत आहे.
आज 20 जानेवारी 2023 रोजी पुणे येथे झालेल्या कार्यशाळेत आपल्या नंदुरबार जिल्ह्य़ातील खालील बाल वैज्ञानिकांनी सहभाग घेतला होता.
अरविंद वळवी-विकास वळवी, वेली, दिपक वसावे – राकेश पावरा, कोठार, आयुष पाडवी – नैतिक पवार, जळखे, रोहिणी वसावे – योगिता पाडवी, खैरवे, श्रेयस चव्हाण, नवापूर,
अथर्व वडनगरे, राज चितलांगे, प्रणव अहिरे, मिताली पाटील, मानसी काळे, प्रणाली लोहार व गायत्री पाटील, नंदुरबार*
या 16 जणांनी उपग्रह बनविण्याच्या कार्यशाळेत सहभाग घेतला.
ऑनलाईन प्रशिक्षण झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची ऑल इंडिया स्तरावर एक परीक्षा सुद्धा होईल. या परीक्षेत प्रथम मेरीटमध्ये येणाऱ्या १०० विद्यार्थ्यांना चेन्नई येथे जाऊन प्रत्यक्ष परत वापरात येणारे राॅकेट बनविण्याची संधी मिळेल.
या राॅकेटचे वजन २२.५ किग्रॅ असेल आणि उपग्रह त्यात फिट केल्यानंतर राॅकेटचे वजन ४५ ते ६० किग्रॅ असेल. सदर राॅकेट १९ फेब्रुवारी २०२३ रोजी तामिळनाडू मधील कांचीपुरम जवळील पट्टीपुर येथून अवकाशात सोडले जाईल. या राॅकेट प्रक्षेपित करण्यासाठी सर्व परवानग्या केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळविण्यात आल्या आहेत. सदरचे राॅकेट उपग्रह अवकाशात सोडल्यानंतर पॅराशूटचे सहाय्याने परत जमिनीवर लॅण्ड करेल आणि पुढील मिशनसाठी परत वापरता येईल. असा प्रयोग अमेरिकेत एलोन मास्क यांनी केला होता.
जागतिक स्तरावर विद्यार्थ्यांनी बनविलेल्या १५० पिको उपग्रहांसोबत असे राॅकेट हा पहिलाच प्रयोग असल्याने १९ फेब्रुवारी २०२३ रोजी हा भारतीय विद्यार्थ्यांचा जागतिक विक्रम, आशिया विक्रम, इंडिया विक्रम, आस्मित वर्ल्ड रेकॉर्ड असे विक्रम स्थापित होतील.अशा प्रयोगाने भारतीय विद्यार्थी अवकाश क्षेत्रात भारताचे नाव अभिमानाने नोंदवतील आणि भविष्यात अशा मिशनमधून डॉ.कलाम यांचे सारखे शास्त्रज्ञ तयार होण्यास आणि नवीन डेव्हलपड भारत तयार होण्यास हातभार लागेल.
महाराष्ट्रात हा प्रकल्प सौ.मनिषा चौधरी (महाराष्ट्र राज्य समन्वयक) व मिलिंद चौधरी (जनरल सेक्रेटरी, डॉ.एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फौंडेशन) यांचे नेतृत्वात होत असल्याची माहिती डॉ.एपीजे अब्दुल कलाम सरांचे फोलोवर आशिष वाणी यांनी दिली आहे.