नंदुरबार l प्रतिनिधी
कोरोना प्रादूर्भावाच्या काळात नाशिक कारागृहातून अभिवचन रजेवर अर्थात पॅरोलवर सोडण्यात आलेले जिल्ह्यातील पाच कैदी अद्यापही फरारच असल्याने त्यांच्याविरोधात नंदुरबार जिल्ह्यातील संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे पॅरोलवर सोडण्यात आलेल्या कैद्यांचा शोध घेणे पोलिसांपुढे आव्हान ठरणार आहे.
कोेरोना प्रादूर्भावाच्या काळात नंदुरबार जिल्ह्यातील पाच कैद्यांना नाशिक मध्यवर्ती कारागृहातून अभिवचन रजेवर सोडण्यात आले होते. यास आता ४५ दिवसाहून अधिकचा कालावधी उलटला असतांनाही सदरचे कैदी अद्यापपर्यंत परतलेले नाहीत.
यामुळे कारागृहात दाखल न झालेल्या कैद्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील पाच कैद्यांविरोधात संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये शहादा तालुक्यातील बामखेडा येथील विजय विठ्ठल महाले, वर्ढे येथील रविंद्र अंबर नाईक, अनिल सुकदेव मोरे या तिघांविरोधात सारंगखेडा पोलिसात भादंवि कलम २२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर वडगाव येथील इंद्रसिंग पाडक्या पावरा, धांद्रे येथील शिवा तारसिंग चित्ते या दोघांविरोधात शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पॅरोलवर सुटलेल्या फरार झालेल्या या कैद्यांना पकडणे पोलिसांसमोर आव्हान ठरणार आहे.