नंदूरबार l प्रतिनिधी
लहान वयात विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रात पुढे जाण्याची संधी उपलब्ध करून दिली तर मुलांमध्ये कुठलीही नैराश्यता किंवा न्यूनगंड निर्माण न होता आनंदाने पुढे जातात व आपली प्रगती साधतात म्हणून मुलांवर लहानपणापासून अभ्यासाचे कुठलेही दडपण किंवा ताणतणाव न देता त्यांच्या बौद्धिक विकासासोबत शारीरिक व मानसिक विकास करणे गरजेचे आहे यासाठी शालेय स्तरावर विविध शालेय उपक्रमातून त्यांच्या कलागुणांना वाव देत आवडीच्या क्षेत्रात पुढे जाण्याची संधी उपलब्ध करून द्यावी असे मत अमळनेर विधानसभेचे मा.आमदार तथा हिरा प्रतिष्ठान संस्थेचे उपाध्यक्ष शिरीष चौधरी यांनी हिरा प्रतिष्ठान संचलित श्री.काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी प्राथमिक विद्यामंदिर व संस्कृती शिशु विहार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
पुढे त्यांनी आपल्या भाषणातून विविध उदाहरणे व दाखले देत विज्ञानाचे महत्त्व सांगितले तसेच विद्यार्थ्यांना लहान वयातच परिसरातील घटनांमधील विज्ञान व दैनंदिन जीवनातील विज्ञान लक्षात आले तर पुढे त्यांच्या संशोधन वृत्तीचा विकास होईल आणि यासाठी शालेय स्तरावर आयोजित होणारे विज्ञान प्रदर्शन हे महत्त्वाची भूमिका निभावत असतात असे सांगितले.
कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित कोळदा येथील कृषी विज्ञान केंद्राचे कृषीतज्ञ पद्माकर कुंदे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करत विज्ञान प्रदर्शनातूनच मोठ मोठ्या शोधाच्या किंवा नवनिर्मितीच्या संकल्पना यांचा उगम होत असतो. लहान वयातच ही संशोधनाची बीजे मुलांमध्ये रोवली गेली तर भविष्यात देशासाठी, समाजासाठी याचा उपयोग होत असतो. आज विज्ञानाने सर्वच क्षेत्र प्रादाकांत केली असून आज सर्वच गोष्टीत विज्ञान दडलेल आहे ते विविध उदाहरणे देत पटवून दिले तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख मान्यवर हिरा प्रतिष्ठान संस्थेच्या संचालिका सौ.अनिता शिरीष चौधरी यांनी आपल्या भाषणातून विज्ञान व तंत्रज्ञानाचे महत्त्व देत विज्ञानामुळे मानवाची जेवढी प्रगती झाली तेवढेच हानी सुद्धा झाली एखाद्या गोष्टीचा जेवढा फायदा असतो तेवढेच दुष्परिणाम सुद्धा असतात म्हणून विज्ञानाचा उपयोग आपल्या बौद्धिक व भौतिक तसेच पर्यावरणाला पूरक अशा प्रगतीसाठीच करावा.विज्ञानाने जरी जग जवळ आले मात्र माणूस माणसापासून दूर झाल्याचे दिसून येते. यंत्रामुळे मानवाचे जीवन सुलभ व सुकर झाले यामुळे मानवातील आळस निर्माण होऊ नये म्हणून लहान वयातच विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासोबत शारीरिक व मानसिक विकास होण्यासाठी शालेय स्तरावर विविध उपक्रम राबवणे गरजेचे आहे.आज विज्ञान प्रदर्शनात सहभागी विद्यार्थी व त्यांनी बनवलेली उपकरणे ही कौतूकास्पद आहेत.
कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून सहकारमहर्षी श्री अण्णासाहेब पी.के.पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सुरेन्द्र पाटील, नगरपालिका शाळा क्रं.1 चे केंद्रमुख्याद्यापक रणजित नाईक व पालक उपस्थित होते.
विज्ञान प्रदर्शनात एकूण 80 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत ऊर्जा,टाकाऊ पासून टिकाऊ, दळणवळण,कृषी,माहिती तंत्रज्ञान,परिसरातील गमतीजमती,शैक्षणिक साहित्य अश्या विविध विषयांवर 40 उपकरणे तयार केलेली होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव तथा शाळेचे मुख्याध्यापक रुपेश चौधरी यांनी केले तर सूत्रसंचालन सतीष काटके व आभार प्रदर्शन श्रीमती नैना सोनवणे यांनी केले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवराज भामरे, विशाल चौधरी,श्रीमती.रेणुका पेंढारकर,शेखर पाटील,सुधाकर ठाकूर,रवी चौधरी आदींनी सहकार्य केले.









